बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित हिची लोकप्रियता अवघ्या जगात आहे. आता तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे देखील चर्चेत राहताना दिसत आहेत. माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी एक्सच्या माध्यमातून भारतीय एचएनआय (हाय-नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स) परदेशात का जातात, याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. भारतात करआकारणी थोडी आव्हानात्मक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, तरी आपल्या देशाविषयीच्या असंख्य गोष्टींमुळे त्यांनी भारताला आपले घर असल्याचे म्हटले आहे.
भारतीय उद्योजक, गुंतवणूकदार आणि चित्रपट निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्या एका पोस्टवर श्रीराम नेने यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रॉनी स्क्रूवाला यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर एका बातमीचा एक भाग शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी लिहिले की, ‘मला खरंच हे कळत नाही की, लोक अशा ठिकाणी का स्थायिक होतात, ज्या ठिकाणाला ते स्वतःचं घर म्हणू शकत नाहीत. तुमच्याकडे मिलेनियरचा टॅग असला तरी, अशा ठिकाणी तुम्ही दुय्यम दर्जाचे नागरिकच असाल. हे म्हणजे अशा बऱ्याच स्टार्टअपसारखं आहे, जे परदेशात सुरू करायला बरे वाटतात. पण, रिव्हर्स लिस्टिंगसाठी रांगेत उभे राहावे लागते.’
रॉनी स्क्रूवाला यांची ही पोस्ट शेअर करताना श्रीराम नेने यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यांनी लिहिले की, ‘मी म्हणेन की भारत बऱ्यापैकी सुरक्षित देश आहे आणि व्यवसायासाठी विश्वाचा केंद्र आहे. इथल्या पायाभूत सुविधा आणि प्रशासन यात आता चांगली सुधारणा होत आहे. पण एलआरएस पॉलिसीमुळे कर आकारणी थोडी आव्हानात्मक आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर इथली संस्कृती आणि माणसं अभूतपूर्व आहेत. मी तुमच्याशी अगदी सहमत. आपला देश हे आपलं घर आहे.’
डॉ. श्रीराम नेने यांच्या या पोस्टवर हजरो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. शिवाय या पोस्टवर लोकांच्या भरपूर कमेंट्स आल्या आहेत. काहींनी त्यांच्या या म्हणण्याला दुजोरा दिला आहे, तर काहींनी असहमती दर्शवली आहे.
'भारताबद्दल हे बोलणं तुमच्यासाठी सोपं आहे. कारण तुमच्याकडे विशेषाधिकार, नेटवर्क आणि मालमत्ता आहे, ज्यामुळे तुमचे काही नुकसान होणार नाही. ज्या सामान्य भारतीयाकडे संपत्ती, पैसा किंवा नेटवर्क नाही, त्याच्यासाठी हे खूप कठीण आहे. तुम्ही स्वतः अमेरिकेत राहता! तुमच्याकडे जिंकण्याची मानसिकता आहे, तुम्हीही मेहनत आणि जिद्दीशिवाय काहीही करत नाही,' असे एकाने कमेंट करत म्हटले आहे.
डॉ. श्रीराम नेने यांच्या पोस्टशी सहमती दर्शवत एका व्यक्तीने लिहिले की, ‘हे खरे आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये फिरल्यानंतर मला स्थायिक होण्यासाठी भारत हे सर्वोत्तम ठिकाण वाटले.’ तिसऱ्या एका व्यक्तीने कमेंट करत लिहिले की, ‘श्रीराम - भारत तुमच्यासाठी सुरक्षित आहे, कारण तुमच्याकडे संपत्ती आणि विशेषाधिकार आहेत. रस्त्यावरील सामान्य माणसाला विचारा की, त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी जगणे सोपे आहे का? आणि जगण्यासाठी रोजची धडपड, संस्कृती, उदारपणा बाजूला ठेवा. इथे महिला सुरक्षित नाहीत . लोक सुरक्षित नाहीत.’
रॉनी स्क्रूवाला यांनी शेअर केलेला लेख मॉर्निंग कॉन्टेक्स्टमध्ये प्रसिद्ध झाला होता. "भारतीय कोट्यधीशांचे स्थलांतर मुख्यत: चांगली जीवनशैली, सुरक्षित वातावरण आणि प्रीमियम आरोग्य आणि शिक्षण सेवांच्या शोधामुळे प्रेरित आहे. पण क्रोनिझम हाही एक घटक आहे,' असं या लेखात लिहिलं आहे.
संबंधित बातम्या