Madhurani Gokhale Prabhulkar on Aai Kuthe Kay Karte: छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या प्रचंड ट्रोल होत आहे. अरुंधती गाडी चालवत असताना, अचानक गाडीचा दरवाजा उघडून त्यातून आशुतोष खाली पडतो आणि एका दगडावर आपटून त्याचा जीव जातो, असा सीन या मालिकेत पाहायला मिळाला आहे. या सीनमुळे प्रेक्षक या मालिकेला चांगलेच ट्रोल करत आहेत. आशुतोषचा मृत्यू होणार या नव्या ट्रकमुळे देखील प्रेक्षक मालिकेवर चांगले संतापले आहे. उगाचच ओढूनताणून ही मालिका प्रेक्षकांना दाखवली जात आहे, आणि निर्माते प्रेक्षकांच्या संयमाचा अंत बघत आहे, असे आरोप देखील मालिकेवर केले जात आहेत.
मालिकेबद्दल इतक्या नकारात्मक प्रतिक्रिया ऐकल्यानंतर मालिकेतील कलाकारांनाही वाईट वाटलं असून, त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या सेटवर नुकतीच कलाकारांची एक पत्रकार परिषद पार पडली. आता मालिकेत ‘अरुंधती’चा एक नवीन प्रवास सुरू होणार आहे. स्टार प्रवाह या वाहिनीने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेची वेळ देखील बदलली आहे. त्यामुळे आता एका नव्या बदललेल्या वेळेत आणि नवीन रूपात अरुंधती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तत्पूर्वी अरुंधतीसह ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील सगळ्यात कलाकारांनी प्रेक्षकांशी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधला. या पत्रकार परिषदेत अरुंधतीने म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने मालिकेला मिळणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रियांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना मधुराणी म्हणाली की, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या प्रेक्षकांनी आशुतोष आणि अरुंधती यांच्यावर भरपूर प्रेम केलं. त्यामुळे आशुतोषचं असं अचानक निघून जाणं, हा धक्का अद्याप कुणालाच पचवता आलेला नाही. अशावेळी प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. आशुतोष्या अशा जाण्याने प्रेक्षक देखील दुःखी झाले आहेत.’
‘मात्र, अरुंधती देखील दुःखी आहे. पण, अरुंधती या सगळ्यावर नक्कीच मार्ग काढेल. प्रेक्षकांनीही या प्रवासात अरुंधतीला खंबीर साथ द्यावी’, असे आव्हान मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने केले आहे. आता आशुतोषी एक्झिट झाल्यावर अरुंधतीच्या आयुष्यात काय घडणार? अरुंधती पुढचा प्रवास कसा करणार? अरुंधतीच्या आयुष्यात कोणते ट्वीस्ट येणार, हे सगळे जाणून घेण्याची उत्सुकता आता प्रेक्षकांना देखील लागली आहे.
संबंधित बातम्या