Lucky Ali Post: ‘ना तुम जानो ना हम’, ‘ओ सनम’ आणि ‘कितनी हसीन जिंदगी’सारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध गायक लकी अलीने आजघडीला मुस्लिम असणे कसे वाटते, यावर खुलासा केला आहे. जग आपल्याला 'दहशतवादी' ठरवते आणि असल्याने ही एकटेपणाची गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लकीने शुक्रवारी त्याच्या एक्स हँडलवर एक पोस्ट लिहिली. यात त्यांनी लिहिले की, ‘आज जगात मुस्लिम असणे ही एकाकीपणाची गोष्ट आहे. पैगंबरांच्या सुन्नतचे पालन करणे ही एकाकीपणाची गोष्ट आहे..तुमचे मित्र तुम्हाला सोडून जातील, जग तुम्हाला दहशतवादी म्हणेल.’
आता चाहत्यांना लकीच्या ट्विटचा संदर्भ लागत नसला, तरी त्यांनी गायकाला दिलासा देण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये गर्दी केली आहे. सगळेच त्यांना आपल्या शब्दांनी दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत.
या पोस्टवर एकाने कमेंट केली की, ‘उस्ताद जी काही लोक चांगले असतात आणि काही वाईट लोकही असतात. माझ्यासारख्या कुणीही नसलेल्या व्यक्तीसाठी तुम्ही एक दिग्गज व्यक्ती आहात आणि नेहमी तसेच राहाल. आणि प्रत्येक चांगला माणूस आयुष्यभर चांगला माणूस असतो. मग तो लकी अली असो वा लकी शर्मा.. याने काहीही फरक पडत नाही.’ आणखी एकाने लिहिलं, ‘याने काही फरक पडतो का? आणि जर तुमचे मित्र तुम्हाला सोडून जात असतील तर ते तुमचे मित्र कधीच नव्हते. तुमच्या धार्मिक श्रद्धेमुळे तुम्ही आजूबाजूच्या लोकांची मानसिकता समजून घेऊ शकलात, अन्यथा आयुष्यभर तुम्ही द्विधा मनस्थितीत असता, याबद्दल तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे.’
‘चुकीच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं चांगलं आहे. जेव्हा आपण भौतिकवादी लोकांनी वेढलेले असतो तेव्हा शांती आणि अध्यात्म मिळणे कठीण असते. पैगंबरांची सुन्नत भांडवलशाहीच्या विरोधात आहे, त्यामुळे ते मुस्लिमांची प्रतिमा मलीन करतात. आपली संगत बदलून टाका’, अशा शब्दांत तिसऱ्याने कमेंट केली आहे. आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिले की,'तुम्ही कॅप्टन, इंजिनिअर, नाविक आहात, याने फार पडत नाही. आपल्या गंतव्यस्थानी सुखरूप पोहोचणे हेच एकमेव ध्येय आहे, इतर काहीही महत्त्वाचे नाही.'
लकी अली हे दिवंगत दिग्गज अभिनेते मेहमूद यांचा मुलगा आहे. ते बेंगळुरूमध्ये राहतात आणि शेतीही करतात. लकी अली २०००च्या दशकाच्या सुरुवातीपासून त्यांच्या सॉफ्ट म्युझिकसाठी ओळखले जातात.
संबंधित बातम्या