बॉलिवूडमध्ये असे काही गायक आहेत की जे सध्या इंडस्ट्रीपासून लांब असले तरी त्यांची गाणी प्रेक्षकांच्या मनावर घर आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध गायक लकी अलीचा देखील समावेश आहे. त्यांनी बॉलिवूडमधील आजवर अनेक गाणी गायली आहेत. आपल्या आवाजाने लाखो लोकांच्या गळ्यातला ताईत झालेला लकी अली यांचा आज १९ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...
दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या ‘तमाशा’ सिनेमात लकी अली यांनी गायलेले ‘सफरनामा…’ हे गाणे आजही अनेकांच्या तोंडावर आहे. लकी अली यांचे खरे नाव मकसूद मेहमूद अली असे आहे. ते प्रसिद्ध विनोदी अभिनेते मेहमूद यांचे पूत्र आहेत. पण एक वेळ अशी आली होती की लकी अली आपल्या वडिलांना देखील ओळखत नव्हते. त्यामागचे कारण म्हणजे लकी अली ११ वर्षे बोर्डिंगस्कूलमध्ये शिकत होते. त्यांचे वडील कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना भेटू शकले नाहीत. लकी कुटुंबातील अनेक लोकांना ओळखायचेच नाहीत. त्यामुळे जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना ओळखलेच नाही.
लकी अली यांनी आजपर्यंत तीन लग्न केली आहेत. त्यांना पाच मुले आहेत. लकी यांनी पहिले लग्न त्यांच्या अल्बममधील सहकलाकार मेघन जेन मॅकक्लिअरीसोबत केले. 'सुनो' या अल्बममध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. मात्र दोन मुलांचे पालक झाल्यानंतर हे दोघे विभक्त झाले. त्यानंतर त्यांनी इनायाशी दुसरे लग्न केले. त्यांना देखील दोन मुले आहेत. मात्र, त्यांचा संसारही फारकाळ टिकला नाही.
लकी यांनी शेवटचे लग्न २०१० मध्ये इंग्लडच्या केट एलिझाबेथ हलामशी केले. त्यावेळी ते ५२ वर्षांचे होते. सध्या लकी अली हे इंडस्ट्रीपासून लांब आहेत. ते गोव्यात राहतात आणि शेती करतात. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, बॉलिवूडमध्ये ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान केला जात नाही. लकी यांना एकांतात राहणं फार पसंत आहे. त्यांना स्वतःहून बॉलिवूडमध्ये पुन्हा यायचे नाही.
वाचा: प्रेक्षकांसाठी खुशखबर! ९९ रुपयांमध्ये पाहा मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा, वाचा कधी आणि कुठे?
लकी अली यांना निसर्गाच्या सानिध्यात राहणे फार आवडते. त्यामुळेच झगमगाटापासून लांब राहून ते शेतीही करतात. त्यांचे एक कुटुंब न्यूझीलंडमध्ये राहते. त्यांची एक पत्नी न्यूझीलंडची असून एक मुलगा आणि मुलगी दोघेही न्यूझीलंडमध्येच शिक्षण घेत आहेत. तिथेच ते छोटेखानी शेतीही करतात. त्यांनी बंगळुरूमध्ये मुलींसाठी एक शाळा सुरू केली आहे.