Longest Film In The World : चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम आहे. कधीकधी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एखादी सत्य कथा देखील सांगितली जाते. इतकंच काय तर, एखादा चित्रपट मोठा असेल, तर तो दोन किंवा तीन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतो. एखादा चित्रपट आवडला तर, प्रेक्षक त्याच्या आगामी भागाची आतुरतेने वाट बघत असतात. मात्र, तुम्हाला जगातील सगळ्यात मोठा चित्रपट किती मोठा आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? हा चित्रपट तुम्ही बघायला बसलात तर तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. चला जाणून घेऊया...
जगातील या सगळ्यात मोठ्या चित्रपटाचे नाव ‘द क्योर फॉर इंसोमेनिया’ आहे. हा चित्रपट जगातील सगळ्यात मोठा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट तब्बल ५२२० मिनिटांचा आहे. म्हणजे तब्बल ८७ तासांचा हा चित्रपट, एखाद्या सामान्य चित्रपटापेक्षा कितीतरी पटींनी मोठा आहे. १९८७ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन जॉन हेनरी टीमिस यांनी केले होते. या चित्रपटाची खासियत म्हणजेच या चित्रपटाला कोणतीही विशेष कथा नाही. या चित्रपटात कलाकार एलडी गरबन ही आपल्या कविता वाचून दाखवताना दिसले आहेत. या कविता तब्बल ४०८० पानांच्या होत्या. विशेष म्हणजे हा चित्रपट इंसोमेनिया म्हणजेच ज्यांना झोप न येण्याची समस्या आहे, अशा लोकांसाठी होता. म्हणूनच या चित्रपटाला ‘द क्योर फॉर इंसोमेनिया’ म्हणजेच इंसोमेनियावरील उपाय असे नाव देण्यात आले होते. या चित्रपटात काही प्रमाणात अश्लील व्हिडिओ देखील होते.
‘द क्योर फॉर इंसोमेनिया’ हा चित्रपट ३१ जानेवारी १९८७ला रिलीज झालेला आणि तो ३ फेब्रुवारी १९८७ला संपला. म्हणजेच ३ दिवस १५ तास एकूण ८७ तास हा चित्रपट सुरू होता. इतकंच नाही तर, हा चित्रपट एकही ब्रेक न घेता किंवा कोणतीही जाहिरात न दाखवता प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने अशाप्रकारे एक विक्रम प्रस्थापित केला होता. हा चित्रपट पहिल्यांदा शिकागो स्कूल ऑफ आर्ट इंस्टिट्यूटमध्ये दाखवण्यात आला होता. या चित्रपटात वाचून दाखवण्यात आलेल्या कविता झोपेच्या तक्रारी असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरल्याचे बोलले जाते.
या चित्रपटाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्यात आले आहे. हा चित्रपट आजवरचा सगळ्यात मोठा चित्रपट ठरला आहे. केवळ मोठा आहे म्हणूनच नाही तर, या चित्रपटातून कला आणि एक नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चित्रपटातून लोकांच्या आयुष्यावर देखील एक मोठा प्रभाव पाडण्यात आला आहे.
संबंधित बातम्या