Lokmanya: केसरी व मराठा वृत्तपत्रं कशी सुरू झाली; 'लोकमान्य' मालिकेतून उलगडणार इतिहास-lokmanya serial update 17th march 2023 ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Lokmanya: केसरी व मराठा वृत्तपत्रं कशी सुरू झाली; 'लोकमान्य' मालिकेतून उलगडणार इतिहास

Lokmanya: केसरी व मराठा वृत्तपत्रं कशी सुरू झाली; 'लोकमान्य' मालिकेतून उलगडणार इतिहास

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 17, 2023 04:21 PM IST

Lokmanya: लोकमान्य मालिकेत आता नवे वळण आले आहे. टिळकांना केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू करताना कोणत्या संकटांचा सामना करावा लागला हे आगामी भागात दाखवले जाणार आहे.

लोकमान्य
लोकमान्य

लोकमान्य मालिकेत बळवंतराव टिळक देशभक्तीची धगधगती मशाल आपल्या देशबांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय घेणार आहेत. हा महत्त्वाचा टप्पा आपल्याला झी मराठी वाहिनीवर १९ मार्चला महाएपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे. लोकमान्य टिळकांनी जनमानसाच्या मनात आपल्या धारदार लेखणीने अढळ स्थान निर्माण केले. टिळकांचे अग्रलेख प्रचंड गाजले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांचं योगदान महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत विशेष उल्लेखनीय आहे. हा महत्त्वाचा टप्पा लोकमान्य मालिकेत सध्या सुरू झालेला आहे.

लोकमान्य मालिकेत आतापर्यंत प्रेक्षकांनी पाहिलं की तरूण पिढीला आपल्या मातीतलं अस्सल राष्ट्रीय शिक्षण देणारी न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा बळवंतरावांनी सुरू केली. या राष्ट्रकार्यामध्ये त्यांना आगरकर, चिपळूणकर यांनी मोलाची साथ दिली. शिक्षणाने तरूणांमध्ये जागरूकता निर्माण होईल, समाजभान येईल असा विश्वास बळवंतरावांना वाटतो. तसेच यापुढे आपल्या देशकार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी, अधिकाधिक लोकापर्यंत राष्ट्रभक्तीचे विचार पोहोचवण्यासाठी टिळकांना वृत्तपत्र सुरू करण्याचा पर्याय योग्य वाटतो. टिळक हा आपला विचार आगरकर आणि चिपळूणकर यांना सांगतात आणि तिघेही मिळून वृत्तपत्र सुरू करण्याच्या कामात स्वतःला झोकून देतात.

टिळकांना केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू करताना कोणत्या संकटांचा सामना करावा लागला, त्यावर त्यांनी कशी मात केली, हे लोकमान्य मालिकेच्या माहएपिसोडमध्ये पाहायला मिळणार. हा एपिसोड १९ मार्च रोजी दुपारी १ आणि रात्री ८ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner
विभाग