Lock Upp 2 Contestant List: बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, आता कंगनाच्या 'लॉकअप २' या शोबद्दल सतत नवनवीन अपडेट्स मिळत आहेत. अशातच आता शोच्या स्पर्धकांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. कंगनाचा प्रसिद्ध वादग्रस्त रियॅलिटी शो 'लॉकअप २' लवकरच ओटीटीवर धडकणार आहे. रिपोर्टनुसार, हा शो ५ ऑक्टोबरला टीव्हीवर झळकणार आहे. दरम्यान, आता शोच्या ९ स्पर्धकांची नावेही समोर आली आहेत. जाणून घेऊया कंगनाच्या तुरुंगात कोणते स्पर्धक होणार कैद...
कंगना रनौतचा 'लॉकअप १' चांगलाच गाजला होता. पहिल्या सीझनमध्ये पूनम पांडे, करणवीर बोहरा, मुनव्वर फारुकी आणि अंजली अरोरा यांसारखे अनेक स्टार्स झळकले होते. पण, विजेत्याची ट्रॉफी मुनव्वरने जिंकली. दरम्यान, आता 'लॉकअप २'च्या संभाव्य स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. या यादीमध्ये कॉमेडियन अभिनेता कृष्णा अभिषेक, 'बिग बॉस ओटीटी २' फेम पुनीत सुपरस्टार, दीपिका आर्या, डॉली चायवाला, 'बिग बॉस ओटीटी ३' स्पर्धक शिवानी कुमारी, मॅक्सटर्न, ऍमिवे बंटाय, ‘बिग बॉस १६’ अभिनेत्री सौंदर्या शर्मा आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक उमर रियाज यांचाही समावेश आहे. पुनीत सुपरस्टारला त्याच्या विचित्र स्वभावामुळे अवघ्या काही दिवसांतच बिग बॉसमधून बाहेर काढण्यात आले होते.
‘लॉकअप २’ व्यतिरिक्त दुसरीकडे सलमान खानच्या शो ‘बिग बॉस १८’चीही चर्चा आहे. या शोबद्दल दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. अशातच या शोमध्ये सहभागी होण्यासाठी अनेकांची नावेही समोर आली आहेत. ‘लॉकअप २’ आणि ‘बिग बॉस १८’ मध्ये संघर्ष झाल्याच्या बातम्याही येत आहेत. टेलिचक्करच्या रिपोर्टनुसार, कंगना रनौतचा शो ५ ऑक्टोबरला ओटीटीवर धडकणार आहे. तर, सलमानचा ‘बिग बॉस १८’ देखील ५ ऑक्टोबरला टीव्ही आणि ओटीटीवर धडकणार आहे. सध्या चाहते या दोन्ही शोची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सलमान खानचा शो बिग बॉसचा स्वतःचा एक मोठा चाहतावर्ग आहे. आतापर्यंत बिग बॉसचे १७ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तर, कंगना रनौतचा शो लॉकअपचा पहिला सीझन २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर २०२४मध्ये याचा दुसरा सीझन चर्चेत आला आहे. कंगना रनौतच्या या शोला ही खूप प्रेम मिळालं आहे. 'लॉकअप सीझन १'चा विजेता मुनव्वर फारुकी ठरला होता. यानंतर मुनव्वरने ‘बिग बॉस सीझन १७’ची ट्रॉफी देखील जिंकली होती. यानंतर मुनव्वर प्रचंड चर्चेत आला होता.