Asha Bhosle Live Performance : वयाच्या ९१व्या वर्षीही आशा भोसले जगभरात तासनतास लाईव्ह परफॉर्म करत आहेत. त्यांचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी अलीकडेच विकी कौशल आणि तृप्ती डिमरी स्टारर 'बॅड न्यूज' या चित्रपटातील सुपरहिट ट्रॅक 'तौबा तौबा'वर धमाकेदार नृत्य करून प्रेक्षकांना थक्क केले आहे. आशा भोसले यांनी पंजाबी गायक करण औजला याने गायलेल्या बॉलिवूड गाण्याला आपल्या आवाजात गात एक क्लासिक टच देखील दिल. आता त्यांच्या परफॉर्मन्सची एक क्लिप इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. केवळ नेटिझन्सच नाही, तर करण औजलाही आता आशा भोसले यांच्या या डान्सचा दिवाना झाला आहे.
दुबईतील एका इव्हेंटमधील आशा भोसले यांचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या पांढऱ्या रंगाची साडी परिधान केलेल्या दिसत आहे. या वयातही आशा भोसले यांच्या डान्स मूव्ह्स पाहून सर्वजण त्यांची प्रशंसा करत आहेत. यावेळी त्यांनी स्टेजवर आनंद तिवारी यांच्या 'बॅड न्यूज' या कॉमेडी चित्रपटातील करण औजलाचे 'तौबा तौबा' हे गाणेही गायले आहे. एवढेच नाही तर, त्यांनी चित्रपटातील विकी कौशलने केलेली कठीण सिग्नेचर स्टेपही रिक्रिएट केली. त्यांचा हा धमाकेदार परफॉर्मन्स पाहून लाईव्ह प्रेक्षक तर दंग झालेच, पण सोशल मीडियावरही आता सगळीकडे त्यांचीच हवा पाहायला मिळत आहे.
गायक करण औजलाने आशा भोसले यांच्यासाठी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक नोट लिहिली. यात तो म्हणाला, ‘@asha.bhosle ज्या, संगीताची देवी आहे, त्यांनी तौबा तौबा गायलं… एका छोट्याशा गावात वाढलेल्या मुलाने लिहिलेले गाणे, ज्याच्या कुटुंबाचा संगीताशी कोणताही संबंध नाही. तसेच त्याला वाद्य यंत्राचे ज्ञानही नाही. या गाण्याला चाहत्यांचेच नव्हे, तर संगीत कलाकारांचेही भरभरून प्रेम मिळाले आहे. पण हा क्षण मी कधीही विसरणार नाही. तुम्ही माझे गाणे अशा प्रकारे सादर केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.’
गायकाने इंस्टा स्टोरीवर स्टेजवर 'तौबा तौबा' गाणाऱ्या आशा भोसले यांची रीलही शेअर केली. त्यासोबत त्यांनी लिहिले की, 'मी हे वयाच्या २७ व्या वर्षी लिहिले आहे. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी माझ्यापेक्षा चांगले गायले. @asha.bhosle आणि मस्त डान्सही केला'. आशा भोसले यांनी रविवारी दुबईत सोनू निगमसोबतच्या मैफिलीत 'तौबा तौबा'वर परफॉर्मन्स सादर केला.
संबंधित बातम्या