मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pankaj Udhas Death : गझल गायक पंकज उधास यांचं निधन; वयाच्या ७२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pankaj Udhas Death : गझल गायक पंकज उधास यांचं निधन; वयाच्या ७२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 26, 2024 05:25 PM IST

Pankaj Udhas Death:गझल गायक पंकज उधास यांचे वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले आहे. पंकज उधास हे दीर्घकाळापासून आजारी होते.

Pankaj Udhas Passes Away
Pankaj Udhas Passes Away

Pankaj Udhas Death:गझल गायक पंकज उधास यांचे वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले आहे. पंकज उधास हे दीर्घकाळापासून आजारी होते. पंकज उधास यांच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी करून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. या निवेदनात असे लिहिले आहे की,'जड अंत:करणाने, आम्हाला हे सांगताना अतीव दुःख होत आहे की,२६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदीर्घ आजाराने पद्मश्री पंकज उधास यांचे दुःखद निधन झाले आहे’. पंकज उधास यांना नेमक्या कोणत्या आजाराने ग्रासले होते, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

गायक पंकज उधास यांच्या कुटुंबाने अधिकची माहिती देताना सांगितले की, २६ फेब्रुवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी ११ वाजता गायक पंकज उधास यांचा मृत्यू झाला. ते गेले बरेच दिवस आजारी होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.’ पंकज उधास यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर संगीतविश्वात शोककळा पसरली आहे. पंकज उधास यांच्यासारख्या दिग्गज गझल गायकाच्या जाण्याने चाहत्यांना दु:ख झाले आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहे.

गायकपंकज उधास हे गझल गायनाच्या विश्वातील एक मोठे नाव होते. त्यांना ‘चिट्ठी आयी है’ या गझलमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. १९८६मध्ये प्रदर्शित झालेल्या'नाम' चित्रपटात या गझलचा समावेश करण्यात आला होता. गायक पंकज उधास यांनी ‘ये दिल्लगी’, ‘फिर तेरी कहानी याद आयी’, ‘चले तो कट ही जायेगा’ आणि ‘तेरे बिन’ या गझलांना आपला आवाज दिला होता.

वयाच्या ६व्या वर्षी कारकिर्दीला सुरुवात!

पंकज उधास यांच्या संगीत कारकिर्दीला वयाच्या अवघ्या ६व्या वर्षी सुरुवात झाली होती. त्यांच्या घरात सुरुवातीपासूनच संगीतमय वातावरण होते. सांगीतिक पार्श्वभूमी असणारे पंकज देखील संगीताच्या दुनियेत आले. पंकज उधास यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, संगीताशी त्यांची पहिली ओळख ही शाळेतील प्रार्थनेपासून सुरू झाली होती. शाळेतल्या प्रार्थनेपासून त्यांनी आपल्या या प्रवासाची सुरुवात केली होती. यांनतर त्यांनी पुढे संगीत विश्व गाजवलं. त्यांचा पहिला अल्बम 'आहट' १९८० मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये त्यांनी अनेक गझल गायल्या. पंकज उधास त्यांच्या गझल गायनामुळे प्रसिद्ध झाले होते. 'जिए तो जिये कैसे बिन आपके', 'चिठ्ठी आयी है', 'चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल', 'ना कजरे की धार, ना मोतियों के हार' ही त्यांची गाणी खूप गाजली होती.

WhatsApp channel

विभाग