
विनोदाचा बादशाह म्हणून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आजही दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नाव घेतले जाते. आता त्यांचा मुलगा अभिनेता अभनय बेर्डे लवकरच 'बॉईज ४' या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने वडिलांबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
अभिनयला मुलाखतीमध्ये 'कॉमेडीच्या बाबतीत वडिलांचा कोणता गुण घ्यायला तुला आवडेल' असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने 'मला स्वत:शी प्रामाणिक रहायचे आहे. कारण माझी भूमिका तशी नाहीये. विनोद बदलला आहे. सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे मी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ शकतो ती म्हणजे टायमिंगची. फक्त तेवढच घेऊ शकतो. त्यामुळे माझ्याकडून प्रयत्न वेगळा आहे. असा रोल त्यांनीही त्यांच्या आयुष्यात कधी कोणत्या सिनेमात केला नसेल. मी माझ्या भूमिकेत जितका खरेपणा टाकता येईल तेवढा प्रयत्न केला आहे' असे उत्तर दिले.
वाचा: अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या ५ भूमिका कोणत्या?
'बॉईज ४' चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत तर या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे. येत्या २० ॲाक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'बॉईज ४' या चित्रपटाविषयी दिग्दर्शक विशाल देवरूखकर म्हणतात की, "या त्रिकुटाच्या मैत्रीची सुरूवात, चांगल्या, वाईट प्रसंगी एकमेकांना दिलेली साथ, थट्टामस्करी यापूर्वीच्या तीन भागांमध्ये सर्वांनी पाहिलेली आहे. मात्र आता या मैत्रीत ट्विस्ट येणार आहे. ’बॉईज’ च्या प्रत्येक भागाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. चित्रपटातील कलाकार जरी तेच असले तरी प्रत्येक वेळी आम्ही प्रेक्षकांसाठी कथेत नवनवीन वळणे आणली. यावेळीही असेच सरप्राईज आहे. त्यात आता आणखी जबरदस्त कलाकार सामील झाले आहेत. त्यामुळे आता ही धमाल चौपट झाली आहे."
संबंधित बातम्या
