भारताच्या गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांची आज २८ सप्टेंबर रोजी जयंती. लता दीदी यांच्या निधनानंतरचा हा त्यांचा तिसरा वाढदिवस आहे. लता मंगेशकर आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी गायलेली हजारो गाणी आजही चाहत्यांच्या मनात ताजी आहेत. त्या कायमच त्यांच्या गाण्यांसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का लता दीदींनी लग्न का केले नव्हते? काय होते त्यामागचे कारण?
इंदूरमधील एका मराठमोळ्या कुटुंबात २८ सप्टेंबर रोजी लता मंगेशकर यांचा जन्म झाला. पूर्वी लोक त्यांना हेमा मंगेशकर या नावाने ओळखायचे. लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणे गरजेचे आहे. लता मंगेशकर यांच्या पहिल्या गाण्यापासून ते त्यांच्या खासगी आयुष्याविषयी चला जाणून घेऊया …
लता मंगेशकर यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत तब्बल ५० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. मात्र, लता मंगेशकर यांनी गायलेलं पहिलं गाणं मात्र कधीच रिलीज होऊ शकलं नाही. या गाण्याचा किस्सा देखील खूप खास आहे. लता मंगेशकर यांनी कधीच चित्रपटात गाणी गाऊ नयेत अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र, तरीही लता मंगेशकर यांनी एका चित्रपटासाठी पहिलंवहिलं गाणं गायलं. मात्र, त्यांचं हे गाणं कधीच रिलीज होऊ शकलं नाही.
लहानपणापासूनच लता दीदी खूप मेहनती होत्या. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली होती. त्यावेळी लता दीदी या अवघ्या १३वर्षांच्या होत्या. घराची जबाबदारी पेलण्यासाठी लतादीदी बाहेर पडल्या. घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी स्वतःकडे कधी लक्ष दिले नाही. लतादीदींनी लग्न न करण्यामागे हे देखील एक कारण होते. तसेच भाऊ, बहिण आणि कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना स्वत:साठी वेळ काढता आला नाही असे स्वत: लता एका मुलाखतीमध्ये म्हणाल्या होत्या.
वाचा: रमेश सिप्पी यांनी 'शोले'चे दिग्दर्शन केलेले नाही; सचिन पिळगावकर यांचा चकीत करणारा खुलासा
एका मुलाखतीमध्ये लता यांना लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी उत्तर देत म्हटले की मला लग्न करायचे होते. ते करता आले नाही. वडिलांच्या निधनानंतर भाऊ, बहिण आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना हातातून वेग निघून गेली. त्यामुळे मला लग्न करता आले नाही.