Lakhat Ek Amcha Dada : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. या मालिकेत एक रोमांचक आणि इमोशनल वळण येत आहे, ज्याची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. लवकरच तुळजा आणि सूर्या मधल्या प्रेमाची सुरुवात होणार आहे. सगळेच या क्षणाची वाट बघत आहेत. तुळजा सूर्याला नदीच्या पात्रात प्रोपोज करणार आहे. या आधी फक्त सूर्याचं, तुळजासाठी असलेलं प्रेम दिसलं होतं. पण, आता तुळजाच्या या साहसी कृत्यामुळे प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव मिळणार आहे. तुळजाच्या या रूपावर सूर्याचाही विश्वास बसणार नाहीये. तुळजा प्रेमाची खरी कबुली देण्यासाठी नदीत उडी मारणार आहे.
या मालिकेच्या प्रोपोजलचा प्रोमो पाहून सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे. हा सीन पाहण्यासाठी तुळजा म्हणजेच दिशा परदेशीही उत्सुक आहे. कारण, तिने पहिल्यांदाच असा सीन शूट केला आहे. आपली उत्सुकता व्यक्त करताना आणि हा सीन कसा शूट केला हे सांगताना दिशा म्हणाली की, ‘तुळजाचा प्रपोजल सीन खूप युनिक आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं काही अनुभवतेय. आम्ही नदीत शूट केलंय आणि त्यावेळी नदीला बऱ्यापैकी प्रवाह होता. मला पाण्यात उडी मारायची होती, पाणी खूप थंड होत आणि हा सीन सर्वांसाठी महत्वाचा होता. वेळ घेऊन आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊनच सीन शूट होत होता. मी हा अद्वितीय अनुभव कधीच विसरू नाही शकणार.’
तुळजा म्हणजेच दिशा परदेशी या सीनबद्दल बोलताना म्हणाली की, ‘मालिकेसाठी मी साडी नेसले होते. पाण्यात उडी मारताना मला साडी आणि मेकअप दोन्ही सांभाळायचा होतं. यासोबतच एक्सप्रेशन देऊन डायलॉग्स ही बोलायचे होते. सगळं एकत्र मॅनेज करून निभावणं मला प्रचंड वेगळा अनुभव देऊन गेलं. शूट करत असताना नितीश आणि माझ्या पायाला मोठ-मोठे दगड टोचत होते. पण, आम्ही हा सीन पूर्ण केला. जवळपास ५-६ तास तो सीन सुरू होता आणि तितका वेळ आम्ही पाण्यात होतो. आम्हीच नाही, तर पूर्ण टीमने ही तितकीच मेहनत केली आणि थोडं दुखणं, खुपणं झालं पण आम्ही खूप मज्जा ही केली.’
या मालिकेचा प्रोमो जेव्हा पहिला, तेव्हा खूप भारी वाटलं. कारण, तेव्हा माहीत नव्हतं की, प्रेक्षकांना कसं वाटेल, त्यांना आवडेल की, नाही. खूप विचार केला गेला होता की, तुळजा कशी सूर्याला प्रोपोज करेल. खूप चर्चेनंतर हा सीन फायनल झाला. पण आता लोकांचा प्रतिसाद पाहून सर्वांच्या मेहनतीचं चीज झालंय असं वाटतंय. प्रेक्षकही उत्सुक होते की, कधी तुळजा आणि सूर्याची प्रेम कहाणी सुरू होतेय.’