Lakhat Ek Amcha Dada: छोट्या पडद्यावर नव्याने दाखल झालेल्या मालिकांमध्ये आता ‘लाखात एक आमचा दादा’ ही नवीकोरी हटके मालिका दाखल झाली आहे. या मालिकेत चार बहिणींच्या भावाची कथा पाहायला मिळणार आहे. अभिनेता नितीश चव्हाण हा या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तर, अभिनेत्री दिशा परदेशी ही या मालिकेत ‘तुळजा’ बनली आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत मुख्य पात्र साकारणाऱ्या दिशा परदेशी हिने नुकताच या मालिकेतील भूमिका मिळाल्यानंतर तिच्या आयुष्यात काय काय घडलं याचा भन्नाट किस्सा शेअर केला आहे.
'लाखात एक आमचा दादा' मालिकेत दिशा परदेशी 'तुळजा' ची भूमिका साकारत आहे. ‘तुळजा’ ही एक सुंदर, सुशील डॉक्टर आहे. स्वभावाने प्रामाणिक आणि अभ्यासात अतिशय हुशार आहे. इतर मुलींना ही अभ्यासासाठी प्रोत्साहित करते. तिला वाटतं की मुलगी शिकली तरच समाजाची प्रगती होईल आणि ती स्वतःच अस्तित्व या जगात निर्माण करू शकेल. ती नम्र, सर्वांचा आदर करणारी आणि समजूतदार आहे. पण, गरज पडली तर, आरे ला कारे करणारी आहे. तुळजा श्रीमंत घरातली मुलगी आहे. तुळजाच्या घरात तिचे बाबा, मोठा भाऊ, लहान भाऊ आहेत सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे तिच्या दोन आई आहेत. तिचे बाबा आणि मोठा भाऊ कडक शिस्तीचे आहेत. तुळजा लहानपणापासून अभ्यासात चांगली असल्याकारणाने घरच्यांनीच निर्णय घेतला की, तिला डॉक्टर बनवायचं. म्हणूनच तिला गावाबाहेर पुणे शहरात एम.बी.बी.एसची तयारी करायला पाठवतात.
या भूमिकेबद्दल बोलताना दिशा म्हणाली की, ‘ही भूमिका माझ्यापर्यंत येण्याचा किस्सा सांगायला आवडेल मला. मागच्या वर्षी मी माझ्या एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्कॉटलंडला गेले होते. त्याचे नाव होते ‘मुसाफिरा’. या चित्रपटाचे प्रोमोशन चालू झाले, चित्रपट प्रदर्शित झाला आणि मला एके दिवशी कॉल आला. कॉलवर विचारले गेले की, तुम्ही दिशा परदेशी बोलताय का आणि ‘मुसाफिरा’ चित्रपटात तुम्हीच काम केलं आहे ना आणि तो कॉलं वज्र प्रॉडक्शनमधून होता. त्यांनी सांगितले की, त्यांची नवीन मालिका येत आहे, जी झी मराठीवर प्रसारित होणार आहे. आम्ही मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीसाठी तुमचा विचार करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही त्या भूमिकेसाठी योग्य आहात.’
‘मला ही गोष्ट आणि माझी भूमिका ऐकून खूप वेगळी वाटली, आणि असा सुरु झाला तुळजाचा प्रवास. मला आनंद होतोय की, या मालिकेच्या माध्यमातून मी घराघरांत पोहचणार आहे. नितीश आणि माझी खूप छान मैत्री आहे. मालिकेत आमचं एक गोड नातं आहे आणि तुम्हालाही ते स्क्रीनवर पाहायला मज्जा येईल. नितीश उत्तम कलाकार आहे. आमची छान मैत्री असल्यामुळे एकदम मजेत सीन्स शूट होतात. सहकलाकारांसोबत सुद्धा छान ट्युनिंग जमलं आहे. मला खासगी आयुष्यात कोणीही दादा नाही. कारण मी माझ्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे. पण मला चुलतभावंडे आहेत आणि त्यांच्यासोबत माझं नातं खूप प्रेमाचं आहे. मला इथे आवर्जून सांगायला आवडेल की, 'लाखात एक आमचा दादा'मध्ये जो माझ्या मोठ्या भावाची भूमिका साकारत आहे, ज्याचे नाव आहे शत्रू. शत्रू आणि तुळजाच मालिकेत कडवट नातं आहे पण खऱ्या आयुष्यात माझं आणि त्याचं नातं, एक मोठा भाऊ आणि लहान बहिणीसारखं आहे. आमची छान मैत्री ही आहे. तो माझी एक लहान बहीणीसारखी ऑफस्क्रीन काळजी घेतो’, असं दिशा म्हणाली.
एक खास आठवण सांगताना दिशा म्हणाली, ‘या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला त्याच दिवशी मला कळलं की, एका सुप्रसिद्ध वृत्तपत्रातर्फे मला २०२४ फेस ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनय क्षेत्रात पहिल्यांदाच मला पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. 'लाखात एक आमचा दादा' मालिका माझ्यासाठी लकी आहे. एकूणच काय तर हे वर्ष माझ्यासाठी खूप लकी ठरलंय. मला अभिनयाच्या क्षेत्रात येऊन तीन-साडेतीन वर्ष झाली. त्या आधी मी एक शास्त्रीय नृत्यांगना होते आणि याही आधी मी तब्बल १० वर्ष मॉडेलिंग केलं आहे. हळूहळू मॉडेलिंग सुटत गेले आणि अभिनयाकडे कल वाढत गेला.’