Lakhat Ek Amcha Dada Latest Update: मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक नव्या मालिका जोरदार धुमाकूळ घालत आहेत. काही नव्या मालिका नुकत्याच प्रेक्षकांच्या भेटीला आल्या असून, त्यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. अभिनेता नितीश चव्हाण याची ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत सूर्या दादा बनलेला नितीश सगळ्यांचेच मन जिंकून घेताना दिसत आहे. तर, आता सूर्या दादाची लव्हस्टोरी पाहण्याची आतुरता आणखीनच वाढली आहे. दरम्यान त्याच्या या प्रेमकहाणीत आता अनेक अडथळे येताना दिसणार आहे.
'लाखात एक आमचा दादा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. कलाकारांचा दमदार अभिनय आणि कथानक हे या मालिकेचं वेगळेपण ठरलं आहे. सध्या मालिकेत एक नाही, तर दोन लग्नांची लगबग सुरू आहे. सूर्या दादाच्या घरी मोठी बहीण तेजू हिचा साखरपुडा ठरला आहे. या साखरपुड्यासाठी घरात जोरदार तयारी सुरू आहे. यामुळे सगळेच उत्साहात आहेत. तर, बहिणींना आनंदात पाहून सूर्या दादाचा आनंद गगनात मावत नाहीये. सूर्याच्या बहिणीच्या लग्नाची तयारी पाहून जालंदर स्वतःच्या मनाशी गाठ बांधतो की, तेजश्रीच्या लग्नाआधी आपल्या घरात तुळजाचं लग्न धूमधडाक्यात व्हायला हवं.
तुळजाचा भाऊ, शत्रुघ्न लोकांना गुंतवून ठेवतो आणि तेजूच्या लग्नात विघ्न आणण्यासाठी गोंधळ घालतो. यासाठी तो सूर्याचा भूतकाळ सगळ्यांना सांगतो. हे कळल्यानंतर सूर्या दादाची आई पळून गेली आहे, यावर जोरदार चर्चा रंगते आणि तेजूचं लग्न मोडतं. सूर्यादादाच्या घरात जेव्हा सगळ्यांना हे कळत तेव्हा संपूर्ण घर उद्ध्वस्त होतं. जालंदरच्या कानावर ही बातमी पोहचते. मात्र, दादाने सर्वांना या दु:खातून बाहेर काढायचा निर्णय घेतला आहे.
तर, दुसरीकडे गावात जत्रा आयोजित केली गेली आहे. त्या जत्रेत तुळजा सूर्याला सांगते की, तिला सत्यजितशी लग्न करायचं नाहीये आणि म्हणूनच ती ज्या जत्रेला जात आहे, तिथे तिला सूर्याची सोबत हवी आहे. हे ऐकून सूर्याने तुळजाला जत्रेला घेऊन जायचे ठरवलं आहे. आता तुळजा तिच्या मनातलं सूर्यासमोर सांगू शकेल? यामुळे सूर्याच्या स्वप्नाला नवीन पंख मिळतील ? तुळजाच्या सत्यजितशी लग्न न करायचा निर्णयामुळे काय असेल जालंदरचा पुढचा डाव? या सर्व प्रश्नांच्या उत्तरे मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना मिळणार आहेत.