आईची माया लावणारा, स्वभावाने निरागस, करारी मर्द, करड्या शिस्तीचा मात्र बहिणींच्या सुखासाठी, त्यांच्या रक्षणासाठी आणि त्यांची लग्न उत्तमोत्तम घरात लागावीत यासाठी दिवस रात्र जीवाचे रान करणारा 'लाखात एक आमचा दादा.' ही मालिका सुरु झाल्यापासूनच प्रेक्षकांची मने जिंकत आहे. आता मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. गावात तुळजाच्या लग्नाची लगबग सुरु आहे. दादाने तुळजाला वचन दिलंय की तो तिचं लग्न तिच्या खऱ्या प्रेमाशी म्हणजेच सिद्धार्थशी लावून देईल. पण आता, लग्न घटिका जवळ आलेय पण सूर्या नैतिक आणि भावनिक संकटात सापडला आहे.
एका बाजूला तुळजा आहे, जिचं सिद्धार्थवर जीवापाड प्रेम आहे, तर दुसऱ्या बाजूला डॅडी, ज्यांची इच्छा आहे की तिने सत्यजितशी लग्न करावं. तुळजाला दिलेले वचन पाळणं आणि कुटुंबासाठी आधारस्तंभ असलेल्या डॅडींचं मन राखणं यात दादा फसला आहे. याच दरम्यान दादा आणि तुळजा या सगळ्यातून सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. सिद्धार्थ, शहराच्या बाहेरील एका चौकात तिची वाट पाहत आहे. सूर्या, तुळजाला तिथे घेऊन जातो ही, पण त्यांना सिद्धार्थ कुठेच सापडत नाही.
इकडे डॅडींच्या घरात दादा आणि तुळजा यांची अनुपस्थिती जाणवते. तुळजाची आई, परिस्थितीमुळे व्यथित होऊन, कुटुंबाच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी सूर्याला विनंती करते. वाढत्या दबावाला आणि अपमानाच्या धमक्याला तोंड देत दादा आणि तुळजाला लग्न करण्याची विनंती करते. दादा तुळजाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. तिच्या कपाळाला सिंदूर लावतो. आता काय होईल जेव्हा सूर्या आणि तुळजा डॅडी समोर नवरा-बायको म्हणून येतील? गावात या जोडप्याला मान मिळेल का ? बहिणी आपल्या वाहिनीचे स्वागत कसं करतील? तुळजा, सूर्याला आपल्या पतीची जागा देईल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.
वाचा: व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे, ते कपडे बदलताना पाहायचे; अभिनेत्रीने केला खबळजनक खुलासा
मोठ्या दिलाचा राजामाणूस ' लाखात एक आमचा दादा ' ही मालिका ८ जुलै २०२४ रोजी सुरु झाली आहे. ही मालिका रात्री साडे आठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत जेष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक , नितीश चव्हाण, दिशा परदेशी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.