चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. यावर्षीच्या ९७व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा लवकरच होणार आहे. जगातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ऑस्कर अवॉर्ड्स' मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. यंदा ऑस्कर २०२५साठी भारताकडून 'लापता लेडीज' या चित्रपटाची निवड केल्याची माहिती फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने दिली. सोमवारी सकाळी ही घोषणा करण्यात आली आहे.
'लापटा लेडीज' या चित्रपटाची जवळपास २९ चित्रपटांमधून निवड करण्यात आली आहे. यामध्ये बॉलिवूडमधील हिट चित्रपट 'अॅनिमल', मल्याळम राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'आट्टम', कान्स पुरस्कार विजेता 'ऑल वी इमेजिन अॅज लाइट' चित्रपट, तमिळ चित्रपट 'महाराजा', तेलुगू सिनेमा 'कल्की २८९८ एडी', बॉलिवूड चित्रपट 'स्वातंत्र्यवीर सावरकर', 'आर्टिकल ३७०' आणि इतर काही हिट चित्रपटांचा समावेश होता.
दिग्दर्शक जाह्नु बरुआ यांच्या अध्यक्षतेखालील १३ सदस्यांच्या समितीने "लापता लेडीज" या चित्रपटाची निवड केली आहे. ऑस्कर पुरस्कारांमधील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी 'लापटा लेडीज' या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑस्कर २०२४मधील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी मल्याळम चित्रपट '२०१८: एव्हरीवन इज अ हीरो'ची निवड करण्यात आली होती.
लापता लेडीज हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी कौतुक केले होते. तेव्हा पीटीआयशी बोलताना किरणने हा चित्रपट ऑस्करसाठी गेला तर स्वप्न पूर्ण होईल असे म्हटले होते. 'माझा लापता लेडीज हा चित्रपट ऑस्करसाठी गेला तर माझे स्वप्न पूर्ण होईल. पण यासाठी खूप मोठी प्रक्रिया आहे. मला आशा आहे की या चित्रपटाचा विचार फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI) कडून नक्की केला जाईल. तसेच ते योग्य चित्रपटाची निवड करतील असा माझा विश्वास आहे' असे किरण राव म्हणाली.
वाचा: 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर रीम शेखनंतर राहुल वैद्यचा अपघात, चेहऱ्यावर आली आग
लापता लेडीज हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात भारतातील ग्रामिण भागातील दोन वधूंची कथा दाखवण्यात आली आहे. लग्न झाल्यानंतर ट्रेनने प्रवास करत असताना वधूंची अदलाबदली होती. त्यानंतर त्या वधूंना शोधण्यासाठी केला जाणारा प्रयत्न सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. या चित्रपटाची निर्मिती किरण राव आणि आमिर खानने केली आहे. या चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रांता आणि स्पर्श श्रीवास्तव मुख्य भूमिकेत आहेत. तसेच त्यांच्यासोबत रवि किशन, छाया कदम आणि गीता अग्रवाल शर्मा देखील दिसत आहेत.