हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन झाले आहे. संगीत सिवन यांनी आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यामध्ये अभिनेता तुषार कपूरच्या 'क्या कूल है हम' चित्रपटाचा देखील समावेश आहे. तसेच रितेश देशमुखच्या 'अपना सपना मनी मनी' या चित्रपटाचे दिग्दर्शनही संगीत सिवन यांनी केले होते. आता संगीत सिवन यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. त्यांनी वयाच्या ६५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
संगीत सिवन यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. संगीत सिवन हे ६५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.
वाचा: बॉबी देओल आधी 'या' अभिनेत्रीने डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून केला 'जमाल कडू' डान्स, वर्षांनी व्हिडीओ व्हायरल
रितेश देशमुखने त्याच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने संगीत सिवन यांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने, 'संगीत सिवन यांचे निधन झाले हे ऐकून मला अतिशय दु:ख होत आहे आणि धक्का बसला आहे. एक नवखा अभिनेता असल्यावर त्याच्यावर कोणीतरी विश्वास ठेवावा असे सर्वांना वाटत असते. तसेच कोणी तरी संधी द्यावी असे वाटत असते. मी क्या कूल है हम आणि अपना सपना मनी मनी चित्रपटासाठी त्यांचे आभारही मानू शकलो नाही' या अशयाचे कॅप्शन दिले आहे.
वाचा: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर चाहत्याने फेकली पाण्याची बाटली, गायिकेने व्यक्त केला संताप
रितेशने पोस्टमध्ये पुढे म्हटले की, 'अतिशय प्रेमाने बोलणे, शांत स्वभाव आणि कमाल माणूस होता. आज माझ्या हृदयाचे तुकडे झाले आहेत. त्यांचे कुटुंबीय, पत्नी, मुले आणि भाऊ सर्वांविषयी माझ्या मनात संवेदना आहे. मला तुमची खूप आठवण येईल. मला तुमचे हसणे कायम लक्षात राहील.'
वाचा: मुंबईत मराठी माणूस चालणार नाही?; दिग्दर्शक अक्षय इंडिकर याची संतप्त पोस्ट व्हायरल
संगीत सिवन हे मल्याळण इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांचा 'योद्धा' हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. त्यांचे वडील सिवन मल्याळम इंडस्ट्रीमधील मोठे नाव आहे. सिवन हे त्याकाळातील मोठे सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक होते. त्यांचा भाऊ संतोष सिवन आणि संजीव सिवन हे चित्रपट निर्माते आहेत.