Kushal Badrike Wrote Post For Chala Hawa Yeu Dya: छोट्या पडद्यावरच्या ‘चला हवा येऊ द्या’ या कथाबाह्य कार्यक्रमाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. सध्या देखील हा कार्यक्रम प्रचंड चर्चेत आला आहे. अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा आवडता असणारा हा ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम आता ऑफ एअर जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. याच दरम्यान काही कलाकारांनी देखील या कार्यक्रमातून काढता पाय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. अशातच आता विनोदवीर अभिनेता कुशल बद्रिके याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित प्रेक्षकांना एक खास आठवण करून दिली आहे.
‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाला आज १० वर्ष पूर्ण झाली आहेत. या कार्यक्रमाने गेली १० वर्ष प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. या संदर्भात एक पोस्ट लिहित कुशल बद्रिके याने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला १० वर्ष पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये कुशल बद्रिके याने लिहिले की, ‘चला हवा येऊ द्या’ आपल्या कार्यक्रमाला बघता बघता दहा वर्ष झाली, लवकरच त्यावर सविस्तर लिहीन. पण, तूर्तास त्या दिवशीचा माझा लूक शेअर करतोय.’ कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर आता चाहते आणि कलाकार देखील कमेंट्स करत आहेत.
कुशल बद्रिके याच्या या पोस्टवर सध्या चाहते भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत. अनेकांनी कुशल बद्रिके याला हा शो सोडून जाऊ नकोस, अशी विनंती केली आहे. 'कुशल भावा तू परत ये चला हवा येऊ द्यामध्ये, आता पहावसं वाटतं नाही', 'चला हवा येवू द्या म्हणजे कुशल दादा आणि कुशल दादा म्हणजे चला हवा येवू द्या असं गणित झालंय...', 'आमच्या नको बोलू दादा आपला बोल आपल्या सारखं वाटत', 'ना दिखावा करतो, ना दुनियादारी करतो....भाऊ ज्या वेळी मैदानात उतरतो त्यावेळी फक्त आणि फक्त धुरळाच करतो’, अशा कमेंट्स त्याच्या या पोस्टवर बघायला मिळत आहे.
आणखी एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, ‘आम्हीही डोक्याला केस नसताना बघत होतो, आज सगळे केस चालले तरीही बघतो,पण आपल्या टीमचा उत्साह पाहता दुःख दुःख कधी राहत नाही, आणि कुशल बद्रिके तुमच्या कॅप्शनमधील कमेंट्स आणि तुमच्या कविता,चारोळ्या यांनी भारावून जातो, असेच आमचं टक्कल गुळगुळीत होईपर्यंत हसवा. कारण हसताय ना हसायलाच पाहिजे...’