Kushal Badrike Viral Post: 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून अवघ्या प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा विनोदवीर कुशल बद्रिके सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कुशल बद्रिके नेहमीच प्रेक्षकांशी कनेक्टेड राहतो. कुशल बद्रिके याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. तो नेहमीच आपल्या आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत जातो. आता देखील त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक अशी पोस्ट शेअर केली आहे, जिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कुशल बद्रिके याने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, 'ह्या सरत्या वर्षाने जाताना बऱ्याच गोष्टी सोबत नेल्या. काही माणसं मनात घर करुन कायमची निघून गेली, त्या रिकाम्या घरांच्या जागा आता कधीच भरुन काढता येणार नाहीत. दरवर्षी प्रमाणे हे वर्ष सुद्धा, “व्याजाचा हप्ता” जावा तसा माझ्यातला थोडा “innocence” घेऊन गेलंच. मी invest केलेल्या “FD” प्रमाणेच माझ्यातही “maturity” आली नाही, ती नाहीच ! बहुतेक कुठे “invest करावं” आणि कुठे “invest व्हावं” हे मला खरच कळत नाही.'
पुढे कुशल लिहितो, 'मित्रांनी सांगितलंय नवीन वर्षात जाताना कोणत्याच emotions च baggage सोबत घेऊन जाऊ नकोस, म्हणून माझ्यातल्या मलाच थोडा मागे ठेऊन निघालोय. बाकी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. येत्या वर्षात व्याज थोडं कमी लागू दे , “investment” ला “maturity” येऊ दे, आणि मनातली रिकामी घरं भाडेतत्वावर का होईना, पण जाऊदेत. मनाच्या उंबरठ्यावर पावलांची ये जा रहायला हवी. (सुकून)'. कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत.
'ही शब्दरूपी कट्यार काळजाला भिडली', 'मनाची घरं ठरवून भरता येत नाहीत आणि ठरवून रिकामी सुद्धा करता येत नाहीत. माती सारखं असतं मन. तिथं कदाचित एखादं झाड उगवून येईल, त्याला लटकून एखादी वेल वर चढेल आणि त्यांना नको असताना तणही उभ राहील. मातीला दोष देऊन फायदा नाही आणि तणाचा द्वेष करून उपयोग नाही. आपण आपल्या मनाची माती सुपीक कशी राहील हे पाहायचं. उगवणं आणि तगवणं दोन्ही आपल्या हातात नाही.', 'दादा तू एक जितका चांगला विनोदी कलाकार आहेस, तसाच तू खूप चांगला लेखक देखील होऊ शकतो. तुझं लिखाण खूप छान आहे. जमलं तर एखादं पुस्तक लिहून टाक.. किंवा मध्येमध्ये आर्टिकल लिहत जा, तुझं लिखाण वाचायला आवडत मला', अशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.