'चला हवा येऊ द्या' या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कुशलने त्याच्या विनोदाच्या टायमिंगने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली. हा कार्यक्रम संपल्यानंतर कुशल मॅडनेस मचायेंगे या हिंदी कार्यक्रमात दिसत आहे. त्यानंतर तो एक चित्रपट करत असल्याचे समोर आले होते. त्याने शुटिंग दरम्यानचे फोटो शेअर केले होते. पण आता सेटवरचे फोटो शेअर केल्यामुळे कुशलने माफी मागितली. तसेच हा प्रोजेक्ट हातातून गेल्याचे देखील सांगितले. चला जाणून घेऊया नेमकं काय झाले...
कुशलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 'नमस्कार काल मी एक पोस्ट केली होती. पण काही तांत्रिक अडचणींमुळे तो सिनेमा मी करु शकत नाही. आणि त्या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक विजू माने असणार होते पण आता त्यांच्या हातातूनही सिनेमा गेला' असे व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. तसेच बॅकग्राऊंडला हमें तो अपनो ने लूटा हे गाणे ऐकू येत आहे.
कुशलचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री श्रेया बुगडेने 'इंटरनॅशनली कॉम कारणामुळे प्रोजेक्ट कॅन्सल झाला... अरे अरे...' अशी कमेंट केली आहे. तर शिवानी बोरकरने 'अरे काय' असे म्हटले आहे. हेमांगी कवीने देखील कमेंट करत 'तांत्रिक की वैयक्तिक कारणांमुळे सिनेमा रद्द झाला' असा प्रश्न विचारला आहे. सुरुची अडेकर, सुयश टिळक आणि इतर कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहेत.
वाचा: सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपूरे खेळणार 'एक डाव भुताचा', काय आहे नेमकी भानगड वाचा
कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये कुशल दोन मॉडेल दिसत आहेत. या मॉडेल बिकिनीवर उभ्या आहेत. तसेच कुशल थोडा गोंधळात दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने 'काहीतरी नवीन करतोय शुभेच्छा असू द्या' असे म्हटले होते. आता कुशल आणि विजू माने नेमकं कोणत्या चित्रपटासाठी काम करत आहेत? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.