‘चला हवा येऊ द्या’ हा शो बंद झाल्यानंतर अनेक कलाकारांनी हिंदी मनोरंजन विश्वाची वाट धरली. ‘चला हवा येऊ द्या’ या शोने तब्बल १० वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. हा शो ऑफ एअर गेल्यानंतर सगळेच प्रेक्षक नाराज झाले होते. मात्र, यातील काही कलाकार हिंदीमध्ये झळकत असल्याने प्रेक्षकांनी त्यांचं कौतुकही केलं. ‘चला हवा येऊ द्या’मधील कुशल बद्रिके आणि अभिनेत्री हेमांगी कवी सध्या ‘मॅडनेस मचायेंगे’ या शोमध्ये झळकत आहेत. मात्र, हिंदीत या मराठी कलाकारांना फारसं प्रेम मिळताना दिसत नाहीये. नुकतेच प्रेक्षक या शोला ट्रोल करताना दिसले आहेत. अनेकांनी कुशल आणि हेमांगी यांना हा शो सोडण्याचा फुकट सल्ला देखील दिला.
अभिनेत्री हेमांगी कवी आणि अभिनेता कुशल बद्रिके यांनी या आधी अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या जोडीने नेहमीच प्रेक्षकांना खूप हसवले देखील आहे. मात्र, नुकत्याच प्रसारित झालेल्या त्यांच्या 'मॅडनेस माचयेंगे’ या कार्यक्रमातील एक विनोदी स्कीटमुळे त्यांना चांगलंच ट्रोल केलं जातंय. ‘मॅडनेस मचायेंगे’ या हिंदी कॉमेडी शोमधून हेमांगी व कुशल याच्या जोडीने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. याच शोमध्ये आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता गौरव मोरेची झलकही पाहायला मिळाली. तसेच, अभिनेत्री अतिषा नाईक हिने देखील एका भागात आपला जलवा दाखवला.
नुकत्याच पार पडलेल्या एका भागात या कलाकारांनी ‘बाहुबली’ या चित्रपटावर आधारित एक स्कीट सदर केलं. या स्कीटमध्ये कुशल बद्रिके हा ‘कटप्पा’ बनला होता, तर हेमांगी कवी ही राजमाता शिवगामी देवी साकारताना दिसली. मात्र, त्यांचं हे स्कीट प्रेक्षकांना फारसं रुचलेलं नाही. त्यांनी स्कीटवर भरपूर टीका केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षक अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. या कार्यक्रमाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट्सद्वारे त्यांची टीका आणि नाराजी व्यक्त केली असल्याचे पाहायला मिळत आहे.
या प्रोमो व्हिडीओवर कमेंट करत एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, ‘पाणटगिरी चालू आहे हिंदीमध्ये जाऊन’. तर, दुसऱ्या एकाने कमेंट लिहित ‘आपली विनोदाची पातळी एवढी खाली गेलीये?’ असा प्रश्न विचारला आहे. एका युजरने लिहिले की, ‘मराठी शोमधून स्क्रिप्ट्स कॉपी केल्या आहेत’. तर आणखी एकाने लिहिले की, ‘हे इतकेही मजेदार किंवा हास्यास्पद नाही’. ‘प्रादेशिक कलाकारांना अशा शोमध्ये प्रेमाखातर नाही, तर एक मजबूरी म्हणून घेतात आणि हे कलाकारही त्याच थराला जाऊन काम करतात’, असे एकाने लिहिले आहे.