बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू चित्रपटसृष्टीत गेली कित्येक वर्ष काम करत आहे. कुणालचा 'राजा हिंदुस्थानी' मधील अभिनय आजही प्रेक्षकांना भावतो. या चित्रपटाच्या वेळेस तो फक्त १० वर्षाचा होता. आज २५ मे रोजी त्याचा वाढदिवस आहे. नसिरुद्दीन शाह यांच्या 'सर' चित्रपटातून पदार्पण करणारा कुणाल फारशा चित्रपटात दिसला नसला तरी त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. कुणालबद्दल अशा काही गोष्टी आहे ज्या त्याच्या चाहत्यांनाही क्वचितही माहित असतील.
कुणाल हा काश्मिरी पंडित आहे. १९८९ पूर्वी काश्मीरमध्येही त्याचं घर होतं. जिथे त्याचे आजी- आजोबा राहत असत. एका मुलाखतीत त्याने खुलासा करत म्हटलेलं की, त्यावेळेस घाटीत तणावपूर्ण वातावरण होतं. तेव्हा एका स्फोटात त्यांचं घर पूर्णपणे उध्वस्त झालं होतं. कुणालच्या म्हणण्यानुसार तो स्फोट इतका मोठा होता की त्याला स्वतःला धक्का बसला होता. परंतु, इतकं होऊनही कुणाल आनंदी होता. त्यांचं उध्वस्त झालेलं घर टीव्हीवर दाखवण्यात येत होतं आणि ही गोष्ट त्याच्यासाठी मोठी होती. कुणाल तेव्हा लहान होता आणि त्याला फार काही समजत नव्हतं. त्यामुळे टीव्हीवर घर दाखवल्याने तो आनंदी झाला होता. त्याच्यामते तो प्रसिद्ध झाला होता.
त्यानंतर घाटीतील तणावामुळे त्यांना त्यांचं घर सोडून जावं लागलं. आपल्या घरापासून दूर झाल्याचं सगळ्यात जास्त दुःख कुणालच्या आजी आजोबांना झालं होतं. वातावरण निवळल्यावर त्याचं कुटुंब अनेकदा श्रीनगरला गेलं मात्र ते त्यांच्या घरी जाऊ शकले नाहीत. 'कलंक' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कुणाल पुन्हा काश्मीरला गेला होता. तेव्हा तो त्याच्या घरी गेला. २५ वर्षांनंतर आपल्या घरी जाऊन तिथल्या लोकांसोबत आपल्या भाषेत बोलून तो खूप आनंदी होता.