Asha Sharma passed away: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आणि काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे निधन झाले आहे. गेल्या एक वर्षापासून आशा हा आजारी होत्या. अखेर त्यांची या आजाराशी झुंज अपयशी ठरली. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिने आणि टीव्ही आर्टीस्ट असोसिएशनने आशा यांच्या निधनाची माहिती दिली आहे. आशा यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
CINTAAने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांनी आशा शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आशा यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्षप्ट झालेले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्या आजारी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी वयाच्या ८८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. आशा यांच्या कुटुंबीयांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अनेक कलाकार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
छोट्या पडद्यावरील मालिका आणि चित्रपटांमध्ये आई व आजीची भूमिका साकारण्यासाठी आशा या विशेष ओळखल्या जायच्या. त्यांना खरी ओळख धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या 'दोन दिशाये' चित्रपटाने मिळवून दिली होती. या चित्रपटात प्रेम चोप्रा, अर्जुन इराणीस निरुपमा रॉय हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. याशिवाय आशा या 'मुझे कुछ केहना है', 'प्यार तो होना ही था' आणि 'हम तुम्हारे है सनम' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होता.
वाचा: अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश
आशा यांनी शेवटचे दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन यांच्या 'आदिपुरुष' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली. तसेच छोट्या पडद्यावरील 'कुमकुम भाग्य', 'मन की आवाज प्रतिग्या', 'एक और महाभारत' अशा काही मालिकांमध्ये काम केले.