सध्या संपूर्ण राज्यात गणोशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहेत. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी होताना दिसत आहे. मुंबईतील 'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी तर भाविकांनी तुडूंब गर्दी केली आहे. अशातच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या अभिनेत्रीला धक्काबुक्कीला झाल्याचे समोर आले आहे. अभिनेत्रीने हा व्हिडीओ स्वत: सोशल मीडियावर शेअर केला आहे.
'कुमकुम भाग्य' आणि 'पांड्या स्टोअर' मालिकेत काम करणारी अभिनेत्री सिमरन बुधरुपसोबत हा प्रकार घडला आहे. सिमरन गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या मंडपात पोहोचली होती. सिमरन एकटीच नव्हती तर तिची आईही गणपतीच्या दर्शनासाठी तिच्यासोबत आली होती. पण या दरम्यान तिच्यासोबत असं काही घडलं, ज्यानंतर ती चर्चेत आली आहे. सिमरनने एक व्हिडिओ शेअर करत लालबागच्या राजा मंडपाच्या बाऊन्सर्सने तिला आणि आईला धक्काबुक्की केल्याचे आरोप केले आहेत.
सिमरनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून लालबागच्या राजाच्या मंडपातील बाऊन्सर्सने तिच्याशी आणि तिच्या आईशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सिमरनने संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला आहे. "मी आणि माझी आई दर्शनासाठी लालबागच्या राजाला गेलो होतो. परंतु तेथील कर्मचाऱ्यांच्या वर्तवणुकीमुळे आम्हाला वाईट अनुभव आला.. फोटो काढत असताना संस्थेतील एका व्यक्तीने माझ्या आईचा फोन हिसकावून घेतला. ती माझ्या मागे रांगेत उभी होती. तिने फोटो काढण्यासाठी जास्त वेळही घेतला नाही. कारण दर्शनाची माझी पाळी आली होती. जेव् आईने फोटो काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा फोन हिसकाऊन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला" असे सिमरन म्हणाली.
पुढे सिमरन म्हणाली, "मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण बाऊन्सर्सनी माझ्याशी गैरवर्तन केले. जेव्हा मी त्यांचे वर्तन रेकॉर्ड करू लागलो तेव्हा त्यांनी माझा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि मी ओरडत होते 'हे करू नका' तुम्ही हे काय करत आहात? जेव्हा त्यांना कळले की मी अभिनेत्री आहे, तेव्हा त्यांनी माघार घेतली."
वाचा: 'बिग बॉस मराठी'साठी अभिजीत-निक्कीने घेतले लाखो रुपये, सूरज चव्हाणला आठवड्याला किती मिळते फी?
सिमरने पोस्टमध्ये म्हटले की, ही संपूर्ण घटना जागरूकता आणि जबाबदारीची गरज अधोरेखित करते. सकारात्मकता आणि देवाच्या आशीर्वादाच्या शोधात लोक अशा ठिकाणी चांगल्या मनाने भेट देतात. त्याऐवजी आम्हाला अरेरावी आणि गैरवर्तनाला सामोरे जावे लागते. गर्दी हाताळणे हे एक आव्हानात्मक काम आहे, परंतु अशा प्रकारे भाविकांसोबत गैरवर्तन न करता सुव्यवस्था राखणे ही तेथील लोकांची जबाबदारी असल्याचे तिने म्हटले.