Krishna Janmashtami: कुणाला मिळालं कृष्णाचं नाव, तर कुणी गाठला शेवटचा थर! कलाकारांनी सांगितल्या दहीहंडीच्या आठवणी!-krishna janmashtami marathi actor rohit parshuram hrishikesh shelar and aayush sanjeev share their dahi handi memories ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Krishna Janmashtami: कुणाला मिळालं कृष्णाचं नाव, तर कुणी गाठला शेवटचा थर! कलाकारांनी सांगितल्या दहीहंडीच्या आठवणी!

Krishna Janmashtami: कुणाला मिळालं कृष्णाचं नाव, तर कुणी गाठला शेवटचा थर! कलाकारांनी सांगितल्या दहीहंडीच्या आठवणी!

Sep 06, 2023 08:09 AM IST

Krishna Janmashtami in Marathi Serial: कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेतील मुख्य कलाकारांनी देखील आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Krishna Janmashtami Marathi actor
Krishna Janmashtami Marathi actor

Krishna Janmashtami in Marathi Serial: आज अवघ्या देशभरात कृष्ण जन्माष्टमी अतिशय उत्साहात साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी मोठमोठ्या दहीहंडींचे आयोजन देखील केले जाते. शाळकरी मुलांमध्ये तर या सणाचा प्रचंड उत्साह असतो. कुणी शाळेत राधा बनतं, तर कुणी कृष्ण... या सणाच्या अनेक आठवणी आपल्या सगळ्यांच्याच मनात कायम ताज्या असतात. केवळ सामान्य प्रेक्षकच नाही तर, कलाकार देखील दहीहंडी आणि कृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने आपल्या आठवणींना उजाळा देतात. आता प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेतील मुख्य कलाकारांनी देखील आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.

रोहित परशुराम (अर्जुन-अप्पी आमची कलेक्टर)

‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये ‘अर्जुन’ साकारणारा अभिनेता रोहित परशुराम आपल्या दहीहंडीच्या आठवणी सांगताना म्हणतो की, 'लहानपणी मी माझ्या गावात सगळ्यांसाठी कृष्णच होतो. अगदी लहानपणापासून दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचो. अगदी कॉलेजच्या दिवसांपर्यंत मी दहीहंड्यांमध्ये सहभागी व्हायचो. आमच्या कॉलेजमध्ये दहीहंडी होत नव्हती, तेव्हा मी आमच्या शिक्षकांना विनंती करून कॉलेजमध्ये दहीहंडीचा उत्सव सुरू केला होता. आता कॉलेजमध्ये ती प्रथा अजूनही सुरू आहे. आताही सगळी मुले कॉलेजमध्ये हा उत्सव जल्लोषाने साजरा करतात. जसजशी जन्माष्टमी जवळ यायची, तसतसे मी आणि माझे मित्र वर्गणी जमा करायचो आणि हंडी फोडून झाली की, सगळे मिळून मस्त वडापाववर ताव मारायचो. या सणाच्या अतिशय सुंदर आठवणी आजही मनात ताज्या आहेत.’

Rakesh Roshan Birthday: राकेश रोशन यांच्या डोक्यावर केस का नाहीत? तुम्हाला माहितीय का कारण? वाचा...

ह्रिषीकेश शेलार (अधिपती-तुला शिकवीन चांगलाच धडा)

प्रेक्षकांचा लाडका ‘अधिपती’ म्हणजेच ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेता ह्रिषीकेश शेलार याने कृष्ण जन्माष्टमीचा खास किस्सा सांगितला. तो म्हणाला की, ‘माझ्या बाबांची श्री कृष्णावर प्रचंड श्रद्धा आहे. म्हणूनच त्यांनी माझे नाव ह्रिषीकेश ठेवले. या गोष्टीचं मला फार अप्रूप आहे. मला लहानपणी आई-बाबा छान कृष्णासारखा सजवायचे. अजून एक रम्य आठवण म्हणजे शाळेत आम्ही सगळे विद्यार्थी डब्बा आणायचो. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सगळ्यांच्या डब्यातील पदार्थ एकत्र करून गोपाळकाला करायचो आणि मज्जेत, आनंदाने खायचो. त्या गोपाळकाल्याच्या प्रसादाची चव काही औरच असायची. आजही ती चव जिभेवर रेंगाळते.’

आयुष संजीव (वेदांत वानखेडे-३६ गुणी जोडी)

’३६ गुणी जोडी’ मालिकेतील ‘वेदांत’ अर्थात अभिनेता आयुष संजीव याने आपल्या कृष्ण जन्माष्टमीच्या आठवणींना उजाळा देताना सांगितलं की, ‘मी माटुंग्याला असतांना कृष्ण जन्माष्टमीचा, तसेच दहीहंडीचा थरार अनुभवला आहे. आम्ही सगळे सवंगडी एकत्र येऊन अत्यंत उत्साहाने दहीहंडी फ़ोडायचो. एकदा तर मला प्रत्यक्ष शेवटच्या थरावर जाऊन दहीहंडी फोडायला मिळाली होती. तो फार अविस्मरणीय असा क्षण होता. मी आजही त्या क्षणाने इतका भारवलेलो आहे. माझी एक मनापासूनची इच्छा आहे की, बॉलिवूडमध्ये मला संधी मिळाली, तर प्रथम दहीहंडी फोडण्याचा प्रसंग किंवा गाणे चित्रित करायला मिळावे. अजून एक छानशी आठवण म्हणजे लहानपणी आम्ही जेव्हा बदलापूरला राहायला गेलो, तेव्हा तिकडे दहीहंडी फारशी कोणी साजरी करत नव्हते. त्यावेळी आम्हा दोघा भावंडांचा फारच हिरमोड झाला. मात्र, त्यावेळी आमच्या आईने घरामध्येच एक सुंदरशी दहीहंडी तयार करून आमची इच्छा पूर्ण केली. त्यावेळी माझ्या छोट्या भावाला कृष्ण बनवण्यात आले होते. आयुष्यात ही गोष्ट एक मखमली आठवण म्हणून कायम लक्षात राहील.’

Whats_app_banner