Korean Actor Song Jae Rim Died : कोरियन मनोरंजन विश्वातून पुन्हा एकदा एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कोरियन अभिनेत्याच्या निधनाने टीव्ही, चित्रपट आणि संगीत उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. १५ वर्षांपासून अभिनय विश्वात नाव कमावणाऱ्या सॉन्ग जे रिम या लोकप्रिय अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला आहे. ३९ वर्षीय अभिनेत्याचा मृतदेह त्याच्या घरातून सापडला असून पोलिसांनीही अभिनेत्याच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. आता चाहते आणि इंडस्ट्री शोकमग्न झाली आहे. गेल्या काही काळात अनेक कोरियन कलाकारांनी ऐन तारुण्यात आपलं आयुष्य संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच आता सॉन्ग जे रिमने देखील आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे.
१२ नोव्हेंबर रोजी, सॉन्ग जे रिम, सोलच्या सेओंग डोंग जिल्ह्यातील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. पोलिसांना घटनास्थळी दोन पानी पत्रही सापडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या पत्राची अद्याप पुष्टी झालेली नाही आणि अभिनेत्याच्या मृत्यूचे खरे कारणही समोर आलेले नाही. मात्र, अभिनेता सॉन्ग जे रिमने आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. पण, सॉन्ग जे रिमच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
पोलिसांनी म्हटले याबद्दल माहिती देताना म्हटले की, त्यांना घटनास्थळी कोणतीही संशयास्पद गोष्ट दिसली नाही. सध्या अभिनेत्याच्या मृत्यूची चौकशी केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सॉन्ग जे रिमचे अंत्यसंस्कार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहेत. सॉन्ग जे रिमने २००९मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. २०१२मध्ये 'द मून एम्ब्रेसिंग द सन' या चित्रपटातून तो खूप प्रसिद्ध झाला होता. नुकताच तो 'माय मिलिटरी व्हॅलेंटाईन'मध्ये दिसला होता.
सॉन्ग जे रिम हा 'टू वीक', 'अनकाइंड लेडीज' आणि 'क्वीन वू'साठीही ओळखले जात होता. त्याने इतके उत्तम शो, चित्रपट आणि वेब सीरिज दिल्या आहेत की, अभिनेत्याच्या निधनाची बातमी वाचून चाहते आता दु:खी झाले आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये कोरियन कलाकरांच्या आत्महत्येच्या बातम्या समोर येत आहेत. यापैकी अनेक कलाकारांनी ऐन तारुण्यात आपलं आयुष्य संपवलं आहे. गेल्या वर्षी ‘पॅरासाईट’ फेम अभिनेता ली सून क्यून वयाच्या ४८व्या वर्षी आपले आयुष्य संपवले. तर, याच्या काही महिने आधी प्रसिद्ध अभिनेत्री-गायिका हाय सो हिने अवघ्या २७व्या वर्षी मृत्यूला कवटाळलं. त्या आधी मूनबीनने देखील २४व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. सध्याच्या जगात वाढत चालेली स्पर्धा आणि त्यातून येणारे नैराश्य हे या आत्महत्यांचे मुख्य कारण असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले गेले होते.