मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणारे, विनोदी अभिनेते म्हणून अशोक सराफ ओळखले जातात. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसते. त्यांनी काही दिवसांपूर्वी 'अशोक मा. मा' या मालिकेच्या माध्यमातून मालिका विश्वात कमबॅक केला आहे. या मालिकेचे केवळ तीन भाग प्रसारित झाले असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या मालिकेची कथा काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
'अशोक मा. मा' या मालिकेत अशोक माजगावकर या रिटायार झालेल्या, अतिशय शिस्तप्रिय व्यक्तीची कथा दाखवण्यात आली आहे. सोसायटीमधील सेक्रेटरी पासून ते वॉचमॅन पर्यंत सर्वजण अशोक यांना घाबरतात. त्यांची शिस्त म्हणजे शिस्त असते हे सर्वांना माहिती आहे. त्यांची दोन मुले आहे. एक मुलगा फोटोग्राफर आणि टूर गाईड आहे. तर दुसरा मुलगा इंजिनिअर असून दुबईत स्थायिक आहे. त्याची पत्नी आणि तिनही मुलांचे अशोक यांच्यावर प्रेम असते. अशोक यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. एकटे राहात असलेल्या अशोक यांच्या घरी कामाला एक बाई येते. ती संपूर्ण कुटुंबाशी जोडलेली आहे. पण अशोक आणि तिचा ३६चा आकडा आहे. हे पात्र मालिकेला विनोदाची झालर जोडत आहे.
अशोक यांच्या पत्नीचा वाढदिवस असतो. तिच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबीय एकत्र येऊन दरवर्षी वाढदिवस साजरा करतात. यंदाही अशोक यांनी संपूर्ण तयारी केलेली असते. पण मोठ्या मुलाला काही तरी काम येते आणि तो येण्यास नकार देतो. दुसरीकडे दुबईत असलेल्या मुलाची मुलगी पडते आणि तिच्या हनवटीला लागते. त्यामुळे त्यांची फ्लाईट मिस होते. यंदा अशोक हे पत्नीचा वाढदिवस एकट्याने साजरा करतात. त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे त्यांची मुले देखील त्यांच्या जवळ नसतात. आता भविष्यात मुले सर्व काही विसरुन त्यांच्या जवळ येणार का? हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
वाचा: 'करण-अर्जुन'मधील बिंदिया सध्या काय करते? १९९३ साली टॉपलेस फोटोशूटमुळे होती चर्चेत
'अशोक मा. मा' या मालिकेत अशोक सराफ हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्यासोबत चैत्राली गुप्ते, शुभवी गुप्ते, रसिका वखरकर, नेहा शितोळे हे कलाकार दिसत आहेत.