Kishore Kumar Birth Anniversary: भारतीय मनोरंजन विश्वातील अजरामर गायक, अभिनेता, निर्माता आणि गीतकार किशोर कुमार यांचा आज वाढदिवस आहे. किशोर कुमार, ज्यांना जग मस्तमौला, आल्हाद अशा अनेक नावांनी ओल्काहते, त्यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली होते. पण, किशोर कुमार मात्र स्वतःचे नाव उलट करून रशोकी रामाकू असे म्हणायचे. किशोर कुमार यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे झाला होता.
किशोर कुमार यांच्या वडिलांचे नाव कुंजलाल गांगुली होते. ते पेशाने व्यवसायाने वकील होते. आभास गांगुली म्हणजेच किशोर कुमार हे चार भावंडांमध्ये सर्वात लहान होते. थोरले बंधू अशोक कुमार हे बॉलिवूडमधील मोठे नाव होते. भावा[प्रमाणेच मनोरंजन विश्वाचं वेड लागलेले किशोर कुमार पळून मुंबईत अशोक कुमार यांच्याकडे आले. त्यावेळी अशोक कुमार यांनी किशोर यांना चित्रपटात काम करण्यास सांगितले.
पण, किशोर कुमार यांना अभिनयात रस नव्हता. मात्र, अशोक कुमार यांच्या आग्रहाखातर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. बॉलिवूडने आभास कुमार यांना 'किशोर कुमार' हे नाव दिले. किशोर कुमार यांनी १९४६मध्ये त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. किशोर कुमार यांना अभिनय फरसा आवडत नव्हता. शूटिंगदरम्यान ते अनेकदा डायलॉगही विसरायचे. अशावेळी अशोक कुमार त्यांना खूप फटकारायचे. ते जरी चित्रपटात अभिनय करत असले, तरी त्यांचं गायक होण्याचं स्वप्न मात्र जिवंत होतं. १९४८मध्ये त्यांनी खेमचंद्र प्रकाश यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘जिद्दी’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा गाणे गायले. ‘मरने की दुआं क्यूं मांगू, जीने की तमन्ना कौन करे’ असे या गाण्याचे बोल होते.
या गाण्यानंतर किशोर कुमार यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर संगीतकार एसडी बर्मन यांची साथ मिळाल्यावर किशोर कुमार यशाचा टप्पा गाठू लागले. किशोर कुमार यांना किशोर दा या नावानेही ओळखले जाते. किशोर कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांचे सर्वांनी कौतुक केले आहे. कुणाला त्यांच्या गायकीची, कुणाला त्यांच्या अभिनयाची तर कुणाला त्यांच्या मस्तमौला शैलीची भुरळ पडली. किशोर कुमार यांनी संगीताचे औपचारिक शिक्षण कधी घेतले नाही, पण देश-विदेशातील चाहते आजही त्यांच्या गाण्यांवर फिदा आहेत.