Kiran Rao on Aamir khan first Divorce: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान हा कायमच चर्चेत असतो. आमिर खान हा त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. आमिरने सर्वात पहिले रिना दत्ताशी लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुले आहेत. पण काही वर्षांनंतर दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आमिरने किरण रावशी लग्न केले. त्यांना देखील एक मुलगा आहे. पण आमिरने किरण रावमुळे रिना दत्ताला घटस्फोट दिला असे अनेकदा बोलले जात होते. आता एका मुलाखतीमध्ये किरण रावने यावर मौन सोडले आहे. तिने आमिरच्या पहिल्या घटस्फोटाबाबत गौप्यस्फोट केला आहे.
आमिर खान आणि रिना दत्ता यांचा २००२ साली घटस्फोट झाला. म्हणजेच लगान चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या एक वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटासाठी किरण राव सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम करत होती. त्यामुळे किरण रावमुळेच आमिरचा पहिला घटस्फोट झाला असे अनेकांना वाटते. नुकत्याच एका मुलाखतीत किरण रावने या घटस्फोटाबाबत भाष्य केले आहे. आमिर खानसोबत आपण २००४ पासून डेटिंगला सुरुवात केली असल्याचे किरण रावने स्पष्ट केले. रिनापासून विभक्त झाल्याच्या दोन वर्षांनंतर आमिर आणि किरण एकत्र आल्याचे समोर आले आहे.
वाचा: ‘आई कुठे काय करते’मधील अनघा उतरणार राजकारणाच्या रिंगणात?
मुलाखतीमध्ये किरण रावने रिना आणि आमिरच्या घटस्फोटावर भाष्य करत म्हटले की, “बऱ्याच लोकांना असे वाटते की आमिर आणि मी लगानपासून डेट करतोय. पण, हे खोटे आहे. आमिर आणि मी स्वदेसच्या वेळी एकत्र आलो. त्यावेळी तो मंगल पांडेचे शूटिंग करणार होता. आशुतोष गोवारीकरसोबत आम्ही कोकच्या काही जाहिराती शूट केल्या होत्या आणि तिथेच आमिरशी मी पुन्हा कनेक्ट झाले. त्याआधी मी आमिरच्या संपर्कात नव्हते. खरे तर लगानवर जेव्हा काम सुरु होते तेव्हा मी त्याच्याशी फारसे बोलले नव्हते. लगानच्या वेळी मी खरंतर दुसऱ्याच व्यक्तीला पाहत होते. २००४ मध्ये जेव्हा आमिर आणि मी बाहेर जायला लागलो तेव्हा सगळ्यांना वाटले की आम्ही 'लगान'चे शूटिंग करत होतो तेव्हापासूनच आमचे सूत जुळले आणि त्यामुळे आमिर रिनाचा घटस्फोट झाला."
वाचा: वयाच्या ५०व्या वर्षी सिद्धू मुसेवालाची आई देणार मुलांना जन्म, वडिलांनी केली पोस्ट
पुढे किरणने लग्न करताना आलेल्या दडपणाविषयी खुलासा केला. "जेव्हा तुम्ही एका घटस्फोटीत व्यक्तीशी लग्न करता त्यावेळी तुमच्यावर मानसिक दबाव असतो. ज्याचा परिणाम कधीकधी तुमच्या नात्यावर होतो. मी कपल काउंसलिंगवर जोर देते. आमिर आणि मी कपल काउंसलिंग केली होती" असे किरण राव म्हणाली होती.
आमिर खान आणि किरणने जवळपास दोन वर्षे डेट केल्यानंतर विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २००५ साली लग्न केले. त्यानंतर २०२१मध्ये त्यांनी घटस्फोटाचा अर्ज केला. घटस्फोट घेतल्यानंतर ही किरण आणि आमिरमध्ये चांगले नाते असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी आमिरची लेक आयराच्या लग्नात किरण रावने धमाल केल्याचे पाहायला मिळाले.