Kiran Rao Laapataa Ladies Day 1 Box Office Collection: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ आमिर खान याची पूर्व पत्नी किरण राव हिने १३ वर्षांनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीत पुनरागमन केले आहे. २०११मध्ये किरण राव हिने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. त्यावेळी तिने ‘धोबीघाट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. या चित्रपटात आमिर खाननेही काम केले होते. आता तब्बल १३ वर्षांनंतर ती ‘लापता लेडीज’ नावाचा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटाचे प्रमोशनही तिने मोठ्या उत्साहात केले होते. आमिर खानने स्वत: या चित्रपटाची निर्मिती केली असून, त्यानेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. मात्र, या चित्रपटाला आता प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाहीये.
किरण राव हिचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला असून, आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचा कमाईचे आकडे समोर आले आहेत. मात्र, या चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे पाहता किरण रावचा कमबॅक चांगलाच फसलेला दिसत आहे. या चित्रपटाची कमाई फारशी चांगली झालेली नाही.
आमिर खान निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, एवढ्या मोठ्या प्रमोशननंतरही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवू शकलेला नाही. रिलीजच्या पहिल्या दिवशी हा चित्रपट १ कोटींचीही कमाई करू शकलेला नाही. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे कलेक्शन ६५ लाख रुपयांच्या जवळपास झाले आहे. चित्रपटाच्या कलेक्शनचे हे आकडे अतिशय निराशाजनक आहेत. ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचे बजेट २० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास चित्रपटाला हिट होण्यासाठी किमान ३० कोटी रुपयांचे कलेक्शन तरी करावे लागेल. मात्र, जर या चित्रपटाने किमान २० कोटींची कमाई केली, तर त्याला सरासरी चित्रपटाचा दर्जा मिळेल. पण, या चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन पाहता हा चित्रपट हिट होईल की, नाही हे सांगणे कठीण आहे.
या चित्रपटासोबत दुसरा कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित झाला नाहीये. मात्र, तरीही या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. पण, आता या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर आधीच कल्ला करणाऱ्या चित्रपटांना सामोरे जावे लागू शकते. यात विद्युत जामवालचा ‘क्रॅक’ हा चित्रपट आहे, तर यामी गौतमचा ‘आर्टिकल ३७०’ देखील सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बॉलिवूडचे हे दोन्ही चित्रपट किरण रावच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला तगडी टक्कर देऊ शकतात.