मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kiran Mane: 'जवान'मधील कलाकारासाठी किरण मानेची खास पोस्ट

Kiran Mane: 'जवान'मधील कलाकारासाठी किरण मानेची खास पोस्ट

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 19, 2023 09:55 AM IST

Kiran Mane social media post: किरण माने यांनी केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याचा एक नाचा ते प्रसिद्ध अभिनेता हा प्रवास सांगितला आहे.

Kiran Mane Post On Jawan
Kiran Mane Post On Jawan

बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवर सध्या ‘जवान’ या चित्रपटाची हवा सुरू आहे. शाहरुख खानने या चित्रपटातून पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला आहे. मराठमोळ्या कलाकारांनी देखील शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे. ‘बिग बॉस मराठी ४’ फेम अभिनेते किरण माने यांनी जवानमधील एका मराठमोळ्या कलाकाराचे कौतुक करत पोस्ट शेअर केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जवान चित्रपटातील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ओंकारदास माणिकपुरी हा कलाकार त्याच्या लहानशा पण दमदार भूमिकेमुळे चर्चेत आला. त्याच्या भूमिकेबद्दल अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिनेत्याच्या भूमिकेसह त्याच्या आतापर्यंतच्या स्ट्रगलबाबत भरभरुन लिहिले आहे.
वाचा: ६ विकेट घेणाऱ्या मोहम्मद सिराजवर अभिनेत्री नाराज, केले सवाल

काय आहे किरण मानेची पोस्ट?

'जवान' मध्ये एका दलित शेतकर्‍याला छितपुट कर्जाच्या वसुलीसाठी त्याच्या बायको, मुलीसमोर आणि गावासमोर नग्न करून मारहाण केली जाते. ट्रॅक्टर ओढून नेला जातो. तरीही तो रडणार्‍या बायकोवर खेकसतो, "तोंड बंद ठेव. पोरीची परीक्षा आहे ना?"... रडणार्‍या मुलीला शांत करत, "काही विशेष नाही गं त्यात. माझीच चूक होती. तू जा. पेपर दे नीट." असं म्हणत कॉलेजला पाठवतो..., आणि स्वत:ला गळफास लावून घेतो.

यानंतर पिच्चरमध्ये शाहरूख आपल्याला भानावर आणतो. देशातल्या शेतकर्‍यांचं वास्तव सांगतो. नंतर पिच्चरभर तो अनेक रूपांत जलवा दाखवतो. विजय सेतूपती आग ओकतो. नयनतारा लख्खपणे चमकते. दिपीका पदुकोन सुखावून जाते. अनेक अनेक कलाकार येऊन जातात. तरीही एवढ्या मोठ्या तगड्या, चकचकीत स्टारकास्टमध्ये या सिनमधला हा साधासुधा शेतकरी, त्याचा केविलवाणा तरीही स्वाभिमानी चेहरा प्रेक्षकांच्या मनामेंदूवर कोरला जातो. नीट लक्षात रहातो. एवढा प्रभावी अभिनय या अभिनेत्यानं केलाय.

ओंकारदास माणिकपुरी असं या अभिनेत्याचं नांव. छत्तीसगढमधल्या एका छोट्या खेड्यातल्या गरीब शेतकर्‍याचा पोरगा. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यानं गांवाकडच्या 'नाटक मंडली'त काम करायला सुरूवात केली. 'नाच्या' म्हणून. उघड्या मैदानात होणार्‍या नाटकाला प्रेक्षक जमवण्यासाठी गाणी म्हणायची, जोक सांगायचे, मिमिक्री करायची, हे त्याचं काम. एक दिवस तो प्रख्यात नाट्य दिग्दर्शक हबीब तन्वीर यांच्या नजरेस पडला. तिथून पुढं त्यानं मागं वळून नाय पाहिलं भावांनो. उत्तरेकडच्या अभिजात नाटकांमध्ये त्याचं नांव आज लै मानानं घेतलं जातं. यापूर्वी तो आमीर खानच्या 'पीपली लाईव्ह' सिनेमातबी आपल्याला दिसला होता.

आपल्याकडे गांवखेड्यांत तमाशातली वगनाट्यं, लोकनाट्यं, कलापथकं यात काम करणारे असे लै लै लै भन्नाट अभिनेते आहेत. ज्यांना योग्य दिग्दर्शकानं मार्गदर्शन केलं, एक संधी मिळाली तर ते त्याचं सोनं करतील. इरफान खान, नवाज, संजय मिश्रा, पंकज त्रिपाठी या उत्तरेकडच्या गांवातल्या पोरांनी जत्रेतल्या नाटकांपास्नं सुरूवात करून हे सिद्ध केलंय.

ग्रामीण मातीतनं वर आलेल्या ओंकारदासला यापुढेही अशा अनेक संधी मिळोत. थिएटरचा पाया असलेले, अभिनयाला अतिशय गांभीर्यानं घेणारे असे पॅशनेट नट भारतीय सिनेमा समृद्ध करणार आहेत... गांवखेड्यातल्या प्रतिभावानांना प्रेरणा देणार आहेत. सलाम ओंकारदास...कडकडीत सलाम !

WhatsApp channel