शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते म्हणून किरण माने ओळखले जातात. ते सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजिक विषयांवर बिनधास्त पणे आणि परखड मत मांडताना दिसतात. तसेच त्यांच्या आगामी प्रोजेक्टविषयी देखील माहिती देताना दिसतात. अनेकदा किरण यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र, ते या सगळ्याला न घाबरता पुन्हा ट्रोलर्सला सुनावताना दिसतात. आता देखील किरण माने यांची पोस्ट चर्चेत आहे. त्यांनी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या प्रयोगाला नकार दिल्याने संताप व्यक्त केला आहे.
‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला’ या नाटकाचा पुणे विद्यापिठात प्रयोग होणार होता. मात्र, या प्रयोगाला अचानक नकार देण्यात आला. नेमकं असं काय झाले की या नाटकाच्या प्रयोगाला नकार देण्यात आला? असा प्रश्न अनेकांनी विचारला. आता अभिनेते किरण माने यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी 'वर्चस्ववादी भेकड आहेत' असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
वाचा: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागरने पत्र लिहून मागितली मुक्ताची माफी, काय असेल आता तिचे पुढचे पाऊल?
वर्चस्ववादी भेकड आहेत. समाजाला समतेच्या, बंधुत्वाच्या नात्यात बांधणार्या कलाकृतींची या लोकांना भिती वाटते. म्हणून तर काल पुणे विद्यापीठानं ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या प्रयोगाला अचानक नकार दिला. अर्थात मला फार आश्चर्य नाही वाटलं. कारण मला माहितीये, हल्ली हुकूमशहांच्या भेदरट पिलावळीचा थयथयाट सुरू आहे. द्वेष पसरवणाऱ्या, खोटा भडक इतिहास सांगणार्या कलाकृतींना राजाश्रय दिला जातो. यात बहुजन महामानवांचा खरा इतिहास सांगून मानवता आणि प्रेमाचा संदेश देणारी नाटकं आली, सिनेमे आले… ते लोकप्रिय झाले… तर लोक एकमेकांचा तिरस्कार कसे करणार? मग लोकांना एकमेकांत झुंजवून, फूट पाडून सत्ता अबाधित ठेवायचं कारस्थान कसं यशस्वी होणार? या भितीनं हे पछाडले आहेत.
फुले-आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त ‘विद्यार्थी विकास मंच’ने या नाटकाचा प्रयोग १२ एप्रिल रोजी विद्यापीठात आयोजित केला होता. रयतेचं स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी झगडलेल्या छत्रपत्री शिवरायांचा खरा इतिहास दाखवणारं हे नाटक आहे. अचानक एक दिवस आधी ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’ने प्रयोगाला परवानगी नाकारली. आता यासाठी कुणाचा दबाव असेल? कारण काय? हे शोधायला आपण आपल्या धडावर असलेलं आपलं डोकं वापरूया…
वाचा: वसु आकाशला आपल्या आयुष्यात जागा देऊ शकेल का? 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिका वेगळ्या वळणावर
त्यासाठी हे पाहुया की नाटकातून संदेश काय दिला आहे? तर, “छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करू नका. शिवरायांनी अठरा पगड जातीचे लोक बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं. अनेक विश्वासू मुस्लीम सहकारी त्यांच्या सैन्यात होते.” हा आशय सांगणारं हे नाटक आहे, ज्याचे आजवर साडेआठशे प्रयोग झालेत. सरळ आहे, हा नकार नाटकाला नाही, तर त्यातून मांडल्या जाणार्या आशयाला आहे. सेन्सारसंमत असलेल्या नाटकाला नकार दिल्यामुळे पुन्हा हे सिद्ध झालंय की ही दडपशाही संविधानाला पायदळी तुडवत आहे. आता तरी आपल्याला जागं व्हायला हवं. झुंडशाहीला जागा दाखवण्याची वेळ जवळ आलीय. आता त्यांनी कितीही थांबवूद्यात…आपण व्यक्त व्हायचं…
बहरे भी सुनलें, इतनी जोर से बोलेंगे
अंधे भी पढ़ लें इतना साफ लिखेंगे
अगर तुम जमीं पे जुल्म लिख दो,
आसमान पे इंकलाब लिखा जाएगा…
सब याद रखा जाएगा,
सबकुछ याद रखा जाएगा!
सध्या सोशल मीडियावर किरण मानेंची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. एका यूजरने “अगदी बरोबर, वास्तव विचार मांडलात” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने “या नाटकाचे पुस्तक छापावे किंवा ई-बुक काढावे, जेणेकरून बहुजन समाजाला या नाटकापर्यंत पोहोचता येईल” असा सल्ला दिला आहे. तिसऱ्या यूजरने “आता वेळ आली आहे अशा हुकूमशाही पद्धतीला कायमच हद्दपार करण्याची, आपले विचार खूप छान आहेत” असे म्हणत किरण मानेंचे कौतुक केले आहे.
संबंधित बातम्या