मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ghungarachi Chaal: कलाकाराच्या जगण्याचा आकांत मांडणारं कथानक; तुम्ही पाहिलंत का ‘घुंगराची चाळ’?

Ghungarachi Chaal: कलाकाराच्या जगण्याचा आकांत मांडणारं कथानक; तुम्ही पाहिलंत का ‘घुंगराची चाळ’?

Feb 12, 2024 06:05 PM IST

Ghungarachi Chaal Marathi Song: एका कलाकाराच्या संघर्षाची खरी कहाणी कलावंत मराठी प्रस्तुत ‘घुंगराची चाळं’ गाण्यामार्फत मांडण्यात आली आहे.

Ghungarachi Chaal Marathi Song
Ghungarachi Chaal Marathi Song

Ghungarachi Chaal Marathi Song: कलाकाराचं आयुष्य सोपं नसतं. कलाकार मेहनत, जिद्द, काबाडकष्ट, मान-अपमान तसंच, कित्येक वर्षे संघर्ष करत असतो. कलाकार घडण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत असते. अशाच एका कलाकाराच्या संघर्षाची खरी कहाणी कलावंत मराठी प्रस्तुत ‘घुंगराची चाळं’ गाण्यामार्फत मांडण्यात आली आहे. नुकतंच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याच्या टिझरनंतर सोशल मीडियावर गाण्याचं भरभरून कौतुक झालं होतं. आता हे गाणं प्रदर्शित होताचं, या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

‘घुंगराची चाळ’ हे गाणं लावणी कलाकार किरण कोरे याच्यावर चित्रीत झालं असून, यात सुप्रसिद्ध लावणी समाज्ञी सुरेखा पुणेकर, निकीता भोरपकर आणि निलेश मुणगेकर हे कलाकार देखील झळकले आहेत. ‘घुंगराची चाळ’ हे गाणं दर्शन घोष यांनी लिहीलं असून, दिग्दर्शनाची धुरा देखील त्यांनीच सांभाळली आहे. या गाण्याचे बोल शुभम दुर्गुळे याने लिहिले असून, त्यानेच या गाण्याला आवाज दिला आहे. या गाण्याचे संगीत विपुल कदम यांनी केले आहे. ‘घुंगराची चाळ’ या गाण्याचे निर्माते निलेश मुणगेकर हे आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Ranveer Singh: जॉनी सिन्ससोबत रणवीर सिंहने शेअर केली स्क्रीन; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायत...

दिग्दर्शक दर्शन घोष गाण्याविषयी बोलताना म्हणाले की, ‘अत्यंत आनंद होत आहे की, शंकर बाबा या गाण्याच्या यशस्वी प्रयोगानंतर घुंगराची चाळ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. आणि ते गाणं सर्व प्रेक्षकांना आवडत आहे. घुंगराची चाळ हे नुसतं गाणं नसून, अनेक कलाकारांच्या जगण्याचा आकांत मी दाखवण्याचा या गाण्यातून प्रयत्न केला आहे. कलावंत मराठीच्या टीमची यात खूप मेहनत आहे. यापुढे आम्ही वेगवेगळ्या विषयांवर, खासकरून सामाजिक विषयांवर गाणी करण्यासाठी कायम प्रयत्नशील असू.’

निर्माते निलेश मनोहर मुणगेकर ‘कलावंत मराठी’विषयी बोलताना म्हणाले की, ‘कलाकारांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देणं. हाच माझा कायम हेतू आहे. कोणताही कलाकार हा छोटा किंवा मोठा नसतो. छोटे असतात ते आपले विचार. म्हणून आपण काळासोबत आपले विचार बदलायला हवेत. मी आतापर्यंत नवनवीन कलाकारांसाठी १००हून अधिक फॅशन शो, शॉर्ट फिल्म्स आणि म्युझिक अल्बम यांची निर्मिती केली आहे. यापुढे ही करत राहणार आहे. आपल्या मराठी कलावंतांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन.’

WhatsApp channel