Kiran Gaikwad New Song: ‘देवमाणूस’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड आता चांगलाच चर्चेत आला आहे. दोन दिवसांपूर्वी किरण गायकवाड याने एक पोस्ट शेअर करून सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का दिला होता. अभिनेत्री अस्मिता देशमुख हिच्यासोबत एक पोस्ट शेअर करून किरण गायकवाड याने प्रेमाची कबुली दिली होती. मात्र, आता त्यांची ही गुडन्यूज वेगळीच निघाली आहे. किरण गायकवाड आणि अस्मिता देशमुख हे एकमेकांच्या प्रेमात पडलेले नसून, त्यांचे एक नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे.
अभिनेता किरण माने याने दोन दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने अस्मिता देशमुख हिचा फोटो शेअर केला होता. या फोटोत तिच्या हातात एक गुलाबांचा गुच्छ दिसत होता. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘ए फेब्रुवारी आहे.. आतातरी फायनली आपण सगळ्यांना सांगूयात का?’ त्याची ही पोस्ट पाहताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. सगळ्यांनाच वाटू लागलेलं की, किरण गायकवाड आणि अस्मिता देशमुख हे एकमेकांच्या प्रेमात पडले असून, त्यांनी जाहीर कबुली दिली आहे. यावर दोघांनीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता या फोटोमागचं गुपित उलगडलं आहे.
मात्र, आता किरण गायकवाड याने एक पोस्ट शेअर करून आपल्या नव्या गाण्याची माहिती प्रेक्षकांना आणि चाहत्यांना दिली आहे. ‘पहिल्याच नजरेत जुळलंय, प्रेमात एकदम घायाळ झालंय.. पहिल्या प्रेमाचं नवं कोरं गाणं 'हार्ट माझं चोरलंय' लवकरच ऐका एव्हरेस्ट मराठीच्या यूट्यूब चॅनलवर!’, असं कॅप्शन देत त्याने आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. या गाण्याच्या पोस्टरमध्ये किरण गायकवाड आणि अस्मिता देशमुख रोमँटिक अंदाजात दिसले आहेत. दोघांच्या रोमॅटिक पोस्ट या गाण्याचे प्रमोशन असल्याचे आता समोर आले आहे. दोघांच्या या नव्या गाण्याच्या घोषाणेमुळे चाहते देखील खूश झाले आहेत.
अभिनेत्री अस्मिता देशमुख आणि अभिनेता किरण गायकवाड यांनी ‘देवमाणूस’ या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेत अभिनेत्री अस्मिता देशमुख हिने ‘डिम्पल’ अर्थात ‘डिम्पी’ची भूमिका साकारली होती. तर, किरण गायकवाड याने डॉक्टर अजित ही भूमिका साकारली होती. या मालिकेत डिम्पल ही डॉक्टरची गर्लफ्रेंड होती. ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेतील त्यांच्या भूमिका तुफान गाजल्या होत्या. आता किरण गायकवाड आणि अस्मिता देशमुख ही जोडी 'हार्ट माझं चोरलंय' या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या