कलर्स टीव्हीच्या 'खतरों के खिलाडी' या साहसी रिॲलिटी शोचा १४वा सीझन नुकताच संपला आहे. नुकताच या शोचा फिनाले पार पडला, यात प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करणवीर मेहरा रोहित शेट्टीच्या या शोचा विजेता ठरला आहे. 'खतरों के खिलाडी १४'च्या चमकदार ट्रॉफीसोबतच करणवीरला एक आलिशान कार आणि २० लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले आहे. करणवीर मेहरासाठी या शोचा प्रवास सोपा नव्हता. त्याच्या पायात मेटल प्लेट असल्यामुळे, त्याला विद्युत प्रवाहाचा समावेश असलेले स्टंट करताना विजेच्या जोरदार झटक्यांचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर, अंतिम फेरीच्या वेळी देखील, त्याला पहिल्या ३ स्पर्धकांमध्ये येण्यासाठी इलेक्ट्रिकल स्टंटचा सामना करावा लागला.
'खतरों के खिलाडी १४'चं विजेतेपद पटकावल्यानंतर एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत करणवीरने आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी करणवीरने सांगितले की, या शोचा तो विजेता होऊ शकतो, अशी त्याला अजिबात अपेक्षा नव्हती. कारण, त्याला सतत असे वाटत होते की, या शोमध्ये असे बरेच लोक होते, जे त्याच्यापेक्षा चांगले स्टंट करू शकतात. स्टंट कठीण असले, तरी प्रत्येक स्टंट प्रामाणिकपणे करायचा एवढाच विचार आपण केल्याचे करणवीर म्हणाला. यामुळेच हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढत गेला.
'खतरों के खिलाडी'च्या या कठीण प्रवासात करणवीर मेहराला अनेकदा भीतीचा सामना करावा लागला. या शोमध्ये, सुरुवातीच्या स्टंटमध्ये हरल्यानंतर, रोहित शेट्टी स्पर्धकाला ‘फियर फंदा’ देतो आणि नंतर स्पर्धकाला एलिमिनेशन स्टंटमध्ये स्वत: ला सिद्ध करावे लागते आणि ही भीती दूर करावी लागते. प्रत्येक एलिमिनेशन स्टंटमध्ये अप्रतिम कामगिरी दाखवून करणवीरने भीतीच्या सापळ्यातून स्वतःला मुक्त केले. 'खतरों के खिलाडी १४'मध्ये अनेक टास्क दरम्यान ‘फियर फंदा’ जिंकणाऱ्या करणवीरने 'तिकीट टू फिनाले' टास्कमध्ये सर्वांना मागे टाकले आणि शोच्या ग्रँड फिनालेमध्ये पहिले स्थान पटकावले.
करणवीरच्या या धाडसी वृत्तीसाठी रोहित शेट्टीने त्याला खास उपाधीही दिली आहे. ग्रँड फिनालेच्या वेळी रोहित शेट्टीने करणवीर मेहराला एक मोठी फोटो फ्रेम भेट दिली. या फ्रेममध्ये करणवीरचा फोटो होता आणि या फोटोवर 'किलर करणवीर' असे लिहिले होते. करणवीरने 'खतरों के खिलाडी'मधील प्रत्येक स्टंट ज्या पद्धतीने केला आहे, त्यासाठी मी त्याला 'किलर' ही पदवी दिली आहे, असे रोहित शेट्टीने म्हटले. करणवीर मेहरा, शालिन भानोत, कृष्णा श्रॉफ, अभिषेक कुमार आणि गश्मीर महाजनी यांनी रोहित शेट्टीच्या या शोच्या ग्रँड फिनालेपर्यंत बाजी मारली होती.