Khatron Ke Khiladi 14 Shilpa Shinde:रोहित शेट्टीचा लोकप्रिय रिॲलिटी शो'खतरों के खिलाडी'च्या १४व्या सीझनमध्ये रोजच रंजक खेळ पाहायला मिळत आहेत. या खेळात काही स्पर्धक आपली जादू दाखवत आहेत. तर, काही स्पर्धक मात्र फिके पडताना दिसत आहेत. या खेळत सहभागी झालेली शिल्पा शिंदे आतापर्यंत काही खास दाखवू शकलेली नाही. पण, तरीही ती या शोचा एक भाग आहे. मात्र, आता या शोमध्ये शिल्पा शिंदेसोबत असे काही घडले की,रोहित शेट्टीने तिला या शोची सगळ्यात ‘लकी स्पर्धक’ असे नाव दिले आहे.
कलर्स टीव्हीचा लोकप्रिय शो'खतरों के खिलाडी'च्या सीझन १४मधून शिल्पा शिंदे जवळपास बाहेर पडली होती. पण या शोमध्ये रोहित शेट्टीने असा ट्वीस्ट आणला की, खराब परफॉर्मन्स देऊनही शिल्पा शिंदे या घरात टिकून राहिली आहे. खरं तर याआधीही शिल्पा शिंदे'खतरों के खिलाडी'मधून बाहेर पडली होती.'खतरों के खिलाडी १४'मधून बाहेर पडणारी ती पहिली खेळाडू होती. पण, चार आठवड्यांनंतर निर्मात्यांनी शिल्पा शिंदे आणि कृष्णा श्रॉफ यांना'वाईल्ड कार्ड स्पर्धक'म्हणून या शोमध्ये परत आणले होते. आता'नो एलिमिनेशन वीक'मुळे शिल्पाला दुसऱ्यांदा या शोमध्ये एन्ट्री करण्याची संधी मिळाली आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीलाच रोहित शेट्टीने जाहीर केले होते की, या आठवड्यात जोडीने स्टंट होणार आहेत.'जोडी स्टंट'अंतर्गत प्रत्येक स्पर्धकाला त्यांच्या जोडीसह त्यांना दिलेला स्टंट सादर करायचा होता. या चॅलेंज राऊंडमध्ये निमृत कौर अहलुवालिया आणि अभिषेक कुमार या जोडीसह गश्मीर महाजन आणि नियती फटनानी आणि शिल्पा शिंदे-करणवीर मेहरा या जोडीला रोहित शेट्टीने चांगलाच धक्का दिला.
या जोड्यांना ‘फायर फंदा’ मिळाला होता. त्यांना आपापसात स्टंट करताना स्वतःला वाचवावे देखील लागणार होते आणि ज्या जोड्या यात अयशस्वी ठरतील त्यांना एलिमिनेशमध्ये जावे लागणार होते. या टास्कमध्ये सगळ्यात आधी या तीन जोड्यांपैकी प्रत्येकी एक स्पर्धकाला पाण्याच्या टाकीवर टांगण्यात आले होते. त्याच्या दुसऱ्या साथीदाराला वेळोवेळी दोरीच्या साह्याने आपल्या साथीदाराला पाण्याखाली बुडवायचे होते. दुसऱ्या साथीदाराला पाण्याखाली जाऊन झेंडे काढून आणायचे होते. या पाण्यात अनेक साप टाकण्यात आले. तिन्ही जोडींनी ही कामगिरी पार पाडली,पण अभिषेक आणि निमृत या जोडीने सर्वाधिक झेंडे काढून एलिमिनेशन स्टंटपासून स्वतःला सुरक्षित केले.
अभिषेक-निमृत सेफ झाल्यानंतर गश्मीर-नियती आणि शिल्पा-करणवीर यांच्यात स्पर्धा होती. या स्पर्धेत गश्मीर आणि नियती सेफ झाले. एलिमिनेशन स्टंटमध्ये शिल्पा शिंदे, करणवीर मेहरा आणि कपिल शर्माची ऑनस्क्रीन पत्नी सुमोना चक्रवर्ती यांच्यात शेवटची लढत झाली. या शेवटच्या सामन्यात सुमोना आणि करणवीरने आपले टास्क पूर्ण केले. मात्र, शिल्पा शिंदेला हा टास्क पूर्ण करता आला नाही. शिल्पा शिंदे टास्क अर्ध्यातच सोडून जेव्हा बाहेर आली, तेव्हा सगळ्यांनाच वाटले होते की, ती एलिमिनेट होईल. मात्र, त्याचवेळी रोहित शेट्टीने या खेळात ट्वीस्ट आणला.
रोहित शेट्टीने आधी शिल्पाच्या एलिमिनेशनची घोषणा केली आणि मग त्याने शालिनला विचारले की, ती ज्या बॉक्सवर उभी होती, त्याच्या आत काय लिहिले आहे?ते वाचा. जेव्हा शालिनने बॉक्स उघडला, तेव्हा बॉक्समध्ये एक कागद ठेवण्यात आला होता आणि त्या कागदावर मोठ्या अक्षरात लिहिले होते'नो एलिमिनेशन'म्हणजेच या आठवड्यात शोमधून कोणालाही बाहेर काढले जाणार नाही. यादरम्यान रोहित शेट्टीने सांगितले की,एपिसोडच्या सुरुवातीलाच हे ठरवले होते की, या आठवड्यात कोणीही शोमधून बाहेर पडणार नाही आणि या निर्णयाचा फायदा शिल्पाला झाला.