Ketki Chitale: 'मेरा अब्दुल ऐसा नही', श्रद्धा वालकर प्रकरणावर केतकी चितळेची पोस्ट
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ketki Chitale: 'मेरा अब्दुल ऐसा नही', श्रद्धा वालकर प्रकरणावर केतकी चितळेची पोस्ट

Ketki Chitale: 'मेरा अब्दुल ऐसा नही', श्रद्धा वालकर प्रकरणावर केतकी चितळेची पोस्ट

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Nov 15, 2022 04:01 PM IST

Shraddha Murder Case : केतकी चितळे ही सतत चर्चेत असते. तिने श्रद्धा हत्याकांडावर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

केतकी चितळे
केतकी चितळे (HT)

दिल्लीत तरुणीच्या हत्येची एक हृदयद्रावक घटना समोर आल्याने लोकांच्या अंगावर शहारे आले आहेत. २६ वर्षीय तरुणाने आपल्या मैत्रिणीचे ३५ तुकडे केले. यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे दिल्लीच्या विविध भागात फेकून दिले. आफताब अमीन पूनावाला आणि श्रद्धाची प्रेमकहाणी अचानक क्राइम स्टोरीमध्ये बदलली. या घटनेविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आता मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री केतकी चितळेने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

केतकीने तिच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने, 'मेरा अब्दुल ऐसा नहीं बरोबर आहे. कारण आप मेलं, जग बुडालं. पण ३५ तुकडे होताना, गळा दाबला जाताना तरी कुठे तरी पश्चात्ताप होत असेल ना? कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल याचा तर विचार केल्यास अंगावर काटा येतोय. मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा (या वेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात?' असे म्हटले आहे. या पोस्टमध्ये तिने जागो_मेरे_देश हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
वाचा: 'डेक्सटर' सीरिज नेमकी काय आहे? ही पाहून आफताबने केली मैत्रिणीची हत्या

केतकी चितळे पोस्ट
केतकी चितळे पोस्ट (HT)

श्रद्धा मुळची महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील होती. मुलीच्या शोधासाठी तिचे वडील पालघर येथूनदिल्लीत आले. ते श्रद्धाच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा त्याला कुलूप होते. त्यांनी मुलगी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करून मुलीच्या नात्याबाबत पोलिसांना सांगितले आणि बेपत्ता होण्यामागे आफताबचा हात असावा असा संशय व्यक्त केला. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आफताबचा शोध सुरू केला आणि त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.चौकशीत आफताबने आपला गुन्हा मान्य केला. त्याने सांगितले की, श्रद्धा त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होती आणि त्यावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Whats_app_banner