FIR against actor Siddique: मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. अशा अनेक अभिनेत्री पुढे आल्या आहेत, ज्यांच्यासोबत यापूर्वी सेटवर गैरवर्तन झाले होते. त्या कास्टिंग काउचच्या बळी ठरल्या होत्या आणि त्याहूनही भयानक घटना त्यांच्यासोबत घडल्या आहेत. याअंतर्गत केरळ पोलिसांनी तरुण अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर प्रसिद्ध अभिनेता सिद्दीकीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने या आठवड्याच्या सुरुवातीला सिद्दीकीवर मीडियाद्वारे गंभीर आरोप केले होते, त्यानंतर त्यांना 'मल्याळम मूव्ही आर्टिस्ट असोसिएशन' (AMMA) या कलाकारांच्या संघटनेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले होते.
हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर मल्याळम चित्रपट सृष्टीत खळबळ उडाली आहे. या अहवालाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. या अहवालाने चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषण आणि लैंगिक असमानता उघड केली आहे. हा अहवाल समोर आल्यापासून अनेक कलाकारांनी पुढे येऊन आपली आपबिती कथन केली आहे. तिरुवनंतपुरम शहर पोलीस हद्दीत कलम ३७६ (बलात्कार) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे राज्य पोलिसांनी बुधवारी सांगितले. तक्रारीनुसार, हा कथित गुन्हा २०१६मध्ये शहरातील एका हॉटेलमध्ये घडला होता. हेमा समितीच्या अहवालानंतर आलेल्या सर्व तक्रारींची चौकशी करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले असून, ते प्रकरणांची चौकशी करेल.
महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर, सिद्दीकी यांनी पोलिसांशी संपर्क साधला. यावेळी अभिनेता सिद्दीकी याने हे आरोप खोटे असल्याचे म्हणत, आपल्याविरुद्ध गुन्हेगारी कट रचला जात असल्याचे म्हटले आहे. राज्य पोलीस प्रमुखांकडे केलेल्या तक्रारीत सिद्दीकी यांनी दावा केला होता की, 'संपूर्ण मल्याळम चित्रपट उद्योगाची प्रतिष्ठा जाणूनबुजून कलंकित केली जात आहे आणि या गुन्हेगारी कटामागे असलेल्यांना समोर आणणे आवश्यक आहे. याप्रकरणी प्रभावी कारवाई करावी, जेणेकरून सत्य बाहेर येईल आणि खोटे व निंदनीय आरोप रचून प्रसिद्ध करण्याच्या गुन्हेगारी कटामागील दोषींवर कारवाई करावी’, अशी माझी विनंती आहे.
हेमा समिती समोर आल्यानंतर केरळच्या उद्योगसमूहात खळबळ उडाली आहे. या रिपोर्टनुसार, इंडस्ट्रीतील अनेक बडे लोक महिलांना कामाच्या संधी देण्याच्या नावाखाली आणि त्या बदल्यात अभिनयात करिअर करण्याच्या नावाखाली आक्षेपार्ह मागण्या करतात. त्याच वेळी, मद्यधुंद लोक त्यांच्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये जबरदस्तीने प्रवेश करतात आणि सेट आणि चेंजिंग रूम देखील महिला सुरक्षित नाहीत. यानंतर पीडित महिलांना गप्प बसण्याची धमकी दिली जाते आणि तसे न केल्यास त्यांचे करिअर धोक्यात येते. या प्रकरणांमध्ये अनेकांची नावे समोर येत आहेत.