Kedar Shinde Viral Post: मराठमोळे चित्रपट दिग्दर्शक-निर्माते केदार शिंदे हे सध्या त्यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. या चित्रपटाआधीच त्यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट देखील रिलीज झाला होता. केदार शिंदे यांच्या या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. यंदा शाहीर साबळे यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करण्यात आलं. याच निमित्ताने त्यांचा नातू अर्थात केदार शिंदे यांनी आपल्या आजोबांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. नुकताच शाहीर साबळे यांचा स्मृतिदिन झाला. या निमित्ताने केदार शिंदे यांनी आपल्या मनातील एक खंत बोलून दाखवली आहे.
केदार शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेय की, ‘बाबा.. शाहीर साबळे.. ३ सप्टेंबर हा तुमचा जन्मदिवस. आज जन्मशताब्दी वर्षाची सांगता होईल. मी २०१९मध्ये जे ठरवलं ते स्वामी कृपेने पूर्ण झालं. तुमच्या आयुष्याचं डॉक्युमेंटेशन झालं. @amazonprime ला आज ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमा उपलब्ध आहे. पुढच्या कित्येक पिढ्या तुम्हाला विसरणार नाहीत, याची खबरदारी घेतली आहे. @everestentertainment @sanjayof69 @ankushpchaudhari यांच्या मदतीने हे शक्य झालं.’
केदार शिंदे आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहितात की, ‘शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही याचं शल्य आयुष्यभर मनात राहील. पण कुणावर का अवलंबून रहायचं? याची शिकवण याच काळात मिळाली. मी पुढे दिग्दर्शक म्हणून कसा आहे?? हे सांगणं मला अवघड असलं तरी, मी शाहीरांचा नातू म्हणून कसा आहे? याविषयी लोकं भरभरून बोलतील याची खात्री आहे.. माझ्या आजोबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? यासाठी एक सिनेमा पाहिला तरी समजून येईल.. माझी नातवंड जेव्हा विचार करतील की, आपल्या आजोबांनी काय केलं? त्यांच्यासाठी बस्स एक तुमचा सिनेमा पाहिला तरी खूप झालं!!!’
अर्थात ज्यांना ‘महाराष्ट्र शाहीर’ म्हणून गौरवलं गेलं, त्यांच्याबद्दल आजच्या पिढीला फारशी माहिती नाही आणि शासनानेही त्यांची दखल घेतलेली नाही, अशी खंत केदार शिंदे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या पोस्टवर आता चाहत्यांनी देखील कमेंट केली आहे. एका चाहत्याने लिहिले की, ‘अलौकिक प्रतिभेचे धनी, आजच्या आमच्या पिढीतल्या लोकांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. पण, हा चित्रपट पाहून त्यांच्या अफाट कर्तृत्वाची जाणीव झाली. हा चित्रपट काढलात त्यासाठी केदार सर तुम्हालाही धन्यवाद!.
संबंधित बातम्या