मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC 16: 'आयुष्य प्रत्येक वळणावर प्रश्न विचारेल आणि तुम्हाला उत्तर द्यावं लागेल'; अमिताभ बच्चन पुन्हा येतायत!

KBC 16: 'आयुष्य प्रत्येक वळणावर प्रश्न विचारेल आणि तुम्हाला उत्तर द्यावं लागेल'; अमिताभ बच्चन पुन्हा येतायत!

Jun 27, 2024 04:46 PM IST

KBC 16 latest Update: अमिताभ बच्चन यांचा सर्वात लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती १६’चा पहिला प्रोमो समोर आला आहे. पुन्हा एकदा ‘बिग बी’ प्रेक्षकांना प्रश्न विचारायला सज्ज झाले आहेत.

kbc 16 promo
kbc 16 promo

KBC 16 latest Update: ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून अमिताभ बच्चन यांना जेवढी ओळख मिळाली आहे, तेवढीच ओळख त्यांना त्यांच्या चित्रपटांमुळे ही कदाचित मिळाली नसती. अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करत आहेत. यांच्या या शोला भरपूर टीआरपी देखील मिळत आहे. आता अमिताभ बच्चन ‘केबीसी’चा १६वा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सीझनचा पहिला प्रोमोही रिलीज करण्यात आला आहे, ज्यात अमिताभ म्हणतात की, ‘आयुष्य प्रत्येक वळणावर प्रश्न विचारेल आणि तुम्हाला उत्तर द्यावं लागेल.’

ट्रेंडिंग न्यूज

प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीनंतर हा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. ‘केबीसी १६’ च्या नव्या प्रोमोमध्ये एक तरुणी दिसत आहे, जिला तिच्या आईकडून खूप ओरडा पडत आहे. आई म्हणते की, ‘तुझ्यासारख्या डोंगर चढणाऱ्या मुलीशी लग्न कोण करणार?’ यानंतर ती मुलगी हसून म्हणते, 'आई, असा मुलगा लग्न करेल, ज्याची विचारसरणी डोंगरापेक्षा उंच असेल.' यानंतर अमिताभ बच्चन म्हणताना दिसत आहेत, ‘आयुष्य प्रत्येक वळणावर प्रश्न विचारेल, त्याचं उत्तर द्यावं लागेल.’

Bigg Boss OTT 3: नवा ट्वीस्ट! बिग बॉसनं सना सुलतानला हटवलं; आता ‘हा’ स्पर्धक बनणार 'जनता का एजंट'

चाहते झाले आतुर!

अमिताभ बच्चन यांच्या केबीसीच्या नव्या सीझनची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, तो हा शो पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. तर, दुसऱ्या युजरने ही बेस्ट टॅगलाईन असल्याचे म्हटले आहे. काही युजर्स ‘कौन बनेगा करोडपती’ सुरू होण्याच्या तारखेबद्दलही विचारताना दिसले आहेत. ‘कौन बनेगा करोडपती १६’ लवकरच सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे.

नवा सीझन कधी होणार सुरू?

‘कौन बनेगा करोडपती १६’ची नोंदणी २६ एप्रिलपासून सुरू झाली होती. गेल्या १५व्या सीझनमध्ये अमिताभ बच्चन यांनी आपल्या निरोपाच्या भाषणाने सर्वांना भावूक केले होते. ते म्हणाले होते की, ‘लेडीज अँड जेंटलमेन, आम्ही आता निघत आहोत. उद्यापासून हा स्टेज असा सजवला जाणार नाही. उद्यापासून आपण इथं येऊ शकणार नाही, हे आपल्या प्रियजनांना सांगण्याची हिंमत नाही आणि मनही नाही.’ बिग बींच्या या भाषणानंतर केबीसीचे चाहते खूपच भावूक दिसत होते. मात्र, आता पुन्हा एकदा अमिताभ बच्चन दरवर्षीप्रमाणे नव्या सीझनसह लवकरच छोट्या पडद्यावर झळकणार आहेत.

WhatsApp channel