KBC 16 Latest Promo: महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या रियॅलिटी शोचा १६वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. टीव्हीचा सर्वात मोठा रियॅलिटी क्विझ शो यावेळी अनेक नव्या बदलांसह छोट्या पडद्यावर परतणार आहे. या शोच्या निर्मात्यांनी पहिल्या एपिसोडचे प्रोमो व्हिडीओ रिलीज करण्यास सुरुवात केली आहे आणि पुन्हा एकदा खेळाडू अमिताभ बच्चन यांच्यासमोर विचित्र मागण्या करताना दिसत आहेत. बिग बी पहिल्याच एपिसोडमध्ये चाहत्यांची मागणी पूर्ण करताना दिसणार आहेत. पण, यावेळी त्यांचा संयम आता काहीसा डगमगताना दिसणार आहे.
‘केबीसी १६’च्या नवीन प्रोमो व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हॉटसीटवर बसलेली स्पर्धक दीपाली सोनी होस्ट अमिताभ बच्चन यांना एक छोटी ऑडिओ रेकॉर्डिंग करण्यास सांगते. यामध्ये बिग बींना दीपाली सोनी यांचे नाव घ्यायचे आहे. दीपाली सोनी म्हणते की, ती हा ऑडिओ रेकॉर्डिंग तिच्या कॉलर ट्यूनला सेट करणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या आवाजात आधीपासूनच कॉलर ट्यूनचे विविध सूर असल्याने स्पर्धक बिग बींच्या आवाजात त्यांचे वैयक्तिक रेकॉर्डिंग म्हणून ठेवू इच्छित आहे.
प्रोमो व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, स्पर्धक अमिताभ बच्चन यांना म्हणतेय की, ‘सर माझं नाव पुन्हा एकदा घ्या ना प्लीज, दीपाली सोनी वडोदरा गुजरात. मी तुमच्या आवाजात कॉलर ट्यून सेट करेन सर.’ सहसा स्पर्धकांच्या अशा मागण्या टाळण्याचा प्रयत्न करणारे अमिताभ बच्चन यावेळी मात्र तिला होकार देतात व्हॉईस रेकॉर्डिंग सुरू करतात. अमिताभ बच्चन रेकॉर्ड करताना म्हणतात की, ‘मी दीपाली सोनी, वडोदरा गुजरात...’ मात्र, त्याचवेळी दीपाली त्यांना अडवते आणि महाते की, ‘सर थोड्या प्रेमाने म्हणा ना...’
दीपालीची मागणी पूर्ण करताना अमिताभ बच्चन यांनी हीच रेकॉर्डिंग थोड्या प्रेमळ पद्धतीने पुन्हा केली. मात्र, पुन्हा एकदा दीपालीने त्यांना थांबवले आणि म्हणाली की, ‘सर डॉनच्या स्टाईलमध्ये रेकॉर्डिंग होऊ शकेल का?’ तर, अमिताभ बच्चन यांनी तिची ही मागणी देखील पूर्ण केली. पण पुन्हा एकदा दीपालीने त्यांना मध्येच अडवले. मात्र, त्यावेळी अमिताभ बच्चन वैतागले आणि म्हणाले की, आता जर तुम्ही पुन्हा काही म्हणालात तर मी हे रेकॉर्डिंग रद्द करेन.
‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोचा नवा सीझन म्हणजेच ‘केबीसी १६’ आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुन्हा एकदा अमिताभ बच्चन त्यांच्या जुन्या प्रश्न विचारण्याच्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. येत्या १२ ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांना ‘केबीसी १६’चा आनंद घेता येणार आहे.