Kaun Banega Crorepati 16 Nareshi Meena: केबीसी १६च्या नव्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत हॉट सीटवर बसून राजस्थानच्या नरेश मीना यांना खेळ खेळण्याची संधी मिळाली आहे. नरेशी मीनाला ब्रेन ट्युमरसारखा गंभीर आजार असल्याचे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. मात्र, तरीही तिची धाडसी वृत्ती पाहून बिग बीही भावूक झाले आहेत. नरेशी मीना म्हणाल्या की, त्यांना उपचारासाठी खूप पैशांची गरज आहे. यावर बिग बींनी तिला वचन देत म्हटले की, ते स्वतः नरेशीला मदत करतील.
‘कौन बनेगा करोडपती १६’च्या मंचावर २७ वर्षीय नरेशी मीनाने आपल्याला ब्रेन ट्यूमर झाल्याची माहिती दिली, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. नरेशी मीना अमिताभ बच्चन यांना म्हणाल्या की, ‘सर मला २०१८ साली ब्रेन ट्युमर झाल्याचे निदान झाले. २०१९ मध्ये माझ्यावर शस्त्रक्रियाही झाली, त्यासाठी माझ्या आईला तिचे दागिने विकावे लागले. शस्त्रक्रियेनंतरही डॉक्टरांना संपूर्ण ट्यूमर काढता आला नाही. आता पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. डॉक्टरांनी प्रोटॉन थेरपीचा सल्ला दिला आहे आणि ती खूप महाग आहे. भारतातील २-४ रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध असून, त्यासाठी २५ ते ३० लाख रुपये खर्च येणार आहे.’
नरेशीची ही जीवनकथा ऐकून बिग बी भावूक झाले. अमिताभ बच्चन नरेशी मीना यांना म्हणाले की, ‘नरेशीजी, प्रोटॉन थेरपीसाठी तुम्हाला मदत करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. मला या प्रवासात तुम्हाला साथ द्यायची आहे. या शोमधून तुम्ही जी काही रक्कम जिंकाल, ती तुमचीच असेल. यातूनही तुम्ही उपचार घेऊ शकाल. ’ आता नरेशी मीना यांचा खेळ १ कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहोचला आहे. केबीसीच्या या पर्वात १ कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या स्पर्धक ठरल्या आहेत.
‘कौन बनेगा करोडपती १६’च्या या नवीन प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. हा भाग अजून प्रसारित व्हायचा आहे. अशा परिस्थितीत नरेशी मीना १५व्या प्रश्नाचे उत्तर देऊन १ कोटी रुपये जिंकू शकतात का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या शो दरम्यान, नरेशी यांनी सांगितले की, त्या जिंकलेल्या रकमेतून ब्रेन ट्यूमरचा उपचार करणार आहेत. त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. त्यांनी खुलासा केला की, त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती १६’ची आरएएस मुख्य परीक्षा सोडली होती. त्या या शोमध्ये मोठ्या अपेक्षा घेऊन आल्या आहेत.