Kaun Banega Crorepati 16: बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोच्या १६व्या सीझनमध्ये दिसत आहेत. या शोमधून त्यांनी अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. याही वेळी प्रेक्षक या शोला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये, दिल्लीतून शालिनी शर्मा नावाची एक स्पर्धक आली होती. शालिनी यांचा १८ वर्षांचा मुलगा बेडवरून देखील उठू शकत नाही. त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असून, बरे होण्याची शाश्वती नाही. शालिनीने अमिताभ बच्चन यांना सांगितले की, ती हॉट सीटवर बसण्यासाठी दिल्लीहून अनवाणी आली होती. तिची ही कहाणी ऐकून अमिताभ बच्चन यांचेही डोळे पाणावले. शालिनीने शोमधून २५ लाख रुपये जिंकले. परंतु, ती ५० लाख रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही. तो प्रश्न काय होता ते जाणून घेऊया...
शालिनी दिल्लीहून ‘केबीसी १६’च्या सेटपर्यंत चप्पल न घालता आली होती. याविषयी सांगताना ती म्हणाली की, तिने नवस केला होता की, जर तिला कधी हॉट सीटवर जाण्याची संधी मिळाली, तर ती अनवाणी तिथपर्यंत जाईल आणि 'कुलदेवी'चे दर्शन घेतल्यानंतरच पुन्हा चप्पल घालेल. यावर बिग बी म्हणतात की, तिला अशाप्रकारे अनवाणी चालताना बघणे त्यांना आवडत नाही आणि ते तिला चप्पल देण्याचा विचार करत आहेत. मात्र, त्यानंतर खेळ सुरू होतो आणि अमिताभ बच्चन शालिनीसोबत 'जल्दी ५'चा गेम सुरू करतात, ज्यामध्ये शालिनी सर्व प्रश्नांची पटकन उत्तरे देऊन फेरी जिंकते.
अनेक प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्यानंतर शालिनी यांच्यासमोर २५ लाख रुपयांसाठी प्रश्न आला होता. प्रश्न असा होता की, ‘यापैकी ८००हून अधिक कुत्र्यांचा मालक कोण आहे, ज्याच्याकडे प्रत्येकासाठी स्वतंत्र परिसर आणि कुत्र्यासाठी कुत्र्यांचे घर आहे?’ या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी शालिनी लाईफलाईन वापरते. 'व्हिडिओ कॉल अ फ्रेंड' लाईफलाईनची मदत घेत, ती आपल्या भावाला फोन करते. कॉलवर तिचा भाऊ सुरुवातीला काहीतरी वेगळे उत्तर देतो. परंतु, कॉल डिस्कनेक्ट करण्यापूर्वी त्याने तिला जुनागढचा नवाब अर्थात डी हा पर्याय निवडण्यास सांगितले आणि हे योग्य उत्तर ठरले. या उत्तरावर तिने २५ लाख रुपये जिंकले.
शालिनी यांनी २५ लाख जिंकल्यानंतर त्यांच्या पुढ्यात ५० लाख रुपयांचा प्रश्न आला. प्रश्न असा होता की,
नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी यापैकी कोणत्या भारतीय महिलांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकमध्ये रौप्य आणि कांस्यपदक जिंकले होते?
ए) एलिझाबेथ डेव्हनपोर्ट
बी) सिल्व्हिया गाँटलेट
सी) मेरी डिसोझा
डी) बार्बरा वेबस्टर.
या प्रश्नाचे अचूक उत्तर होते पर्याय ए) एलिझाबेथ डेव्हनपोर्ट. मात्र, शालिनीला या प्रश्नाचे अचूक उत्तर लक्षात आले नाही आणि या प्रश्नावर तिने खेळ सोडून २५ लाख घेण्याचा निर्णय घेतला.