Kaun Banega Crorepati 15: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या क्विझ रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती १५'ला दुसरा करोडपती मिळाला आहे. १ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन, उत्तर प्रदेशचा जसनील कुमार ‘कौन बनेगा करोडपती १५’चा दुसरा ‘करोडपती’ बनला आहे. ३६ वर्षीय जसनील हा उत्तर प्रदेशातील अन्वाक येथील रहिवासी आहे. अन्वाक हे आझमगड जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. जसनील हा एका छोट्याशा कपड्याच्या दुकानात काम करतो. त्यांच्या कुटुंबात आई, वडील, आजोबा, त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. त्याला चार लहान भाऊ आणि दोन बहिणीही आहेत. आयुष्यात अनेक संपर्ष करत जसलीन केबीसीच्या मंचापर्यंत पोहोचला होता.
यावेळी अमिताभ बच्चन यांनी देखील जसनीलला ‘एक कोटी जिंकलास तर काय करशील?’ असा प्रश्न विचारला. यावर जसनील म्हणाला की, 'मोठा मुलगा म्हणून मला अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. ही इतकी रक्कम कमावण्याचा जरी मी प्रयत्न केला, तरी कदाचित यासाठी मला संपूर्ण आयुष्यभर मेहनत करावी लागली असती. केबीसी हे एक व्यासपीठ आहे, ज्यामुळे मला माझ्या कुटुंबाचे नशीब एका रात्रीत बदलण्यास मदत झाली. मी जी काही बक्षीस रक्कम जिंकलो, ती मी माझे घर बांधण्यासाठी वापरणार आहे.’
यानंतर शो होस्ट अमिताभ बच्चन यांनी जसनीलला एक कोटी रुपयांचा प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की, 'कोणाच्या यज्ञानंतर त्यातून उरलेले सोने पांडवांनी त्यांचा खजिना भरून काढण्यासाठी आणि अश्वमेध यज्ञ करण्यासाठी वापरले?' या प्रश्नासाठी पर्याय होते, ए: विकर्ण, बी: मारुत्ता, सी: कुबेर आणि डी: लिखिता.
या प्रश्नाचे जसनीलने अचूक उत्तर दिले, जे 'मारुत्ता' असे होते. या प्रश्नाचे बरोबर उत्तर देऊन जसनीलने १ कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले. एक कोटी जिंकताच त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते. यावेळी आनंदाने भारावून गेलेल्या जसनीलने अमिताभ बच्चन यांच्या पायावर लोटांगण घातले. यानंतर अमिताभ यांनी जसनीलला ७ कोटी रुपयांसाठी शेवटचा प्रश्न विचारला की, 'भारतीय वंशाची लीना गाडे कोणती शर्यत जिंकणारी पहिली महिला रेस इंजिनियर आहे?' यासाठी पर्याय होते, ए: Indianapolis 500, बी: 24 Hours of Le Mans, सी: 12 Hours of Sebring आणि डी: Monaco Grand Prix. जसनीलने या प्रश्नाचे उत्तर दिले, मात्र त्याची खात्री वाटत नसल्यामुळे त्याने एक कोटी घेऊन खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.