बॉलिवूड अभिनेत्रींच्या मैत्रिची अनेक उदाहरणे आहेत. त्या एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होताना दिसतात. चांगली मैत्री असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेत्री आलिया भट्टचे नाव घेतले जाते. गेल्या काही वर्षांपासून त्या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकदा त्या एकमेकींसोबत वेळ घालवताना दिसतात. एकदा दोघीही एका शोमध्ये गेल्या होत्या. तेव्हा कतरिनाने एक किस्सा सांगितला. तिने एकदा आलियाला मध्यरात्री २-३च्या दरम्यान मेसेज करुन मदत मागितली होती. चला जाणून घेऊया नेमकं काय झालं होतं...
आलिया भट्ट आणि कतरिना कैफ एकदा बीएफएफ विथ वोग शोमध्ये एकत्र गेल्या होत्या. यावेळी दोघांनीही आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच्या मैत्रीबद्दल मोकळेपणाने वक्तव्य केले. दरम्यान, कतरिनाने सांगितले की, एकदा तिने रात्री 2-3 च्या सुमारास आलिया भट्टला मेसेज केला आणि इन्स्टाग्रामशी संबंधित प्रश्न विचारत मदत मागितली होती.
कतरिना कैफने या शोमध्ये खासगी आयुष्यापासून ते व्यावसायिक जीवनावर वक्तव्य केले. त्यावेळी ती म्हणाली, 'माझ्या इन्स्टाग्रामवर काही तरी प्रॉब्लेम दाखवत आहे. एकदा मी आलियाला रात्री २-३ वाजता मेसेज केला होता. माझा फोटो इन्स्टाग्रामवर का बसत नाही. मी काय करायला हवे. असा मेसेज मी तिला केला होता. माझ्या या मेसेजला आलियाने लगेच रिप्लाय दिला होता. तुला फोटोचा आकार कमी करावा लागेल आणि मग अपलोड होईल असे ती म्हणाली. मी तेच केलं. तरीही माझा फोटो अपलोड झाला नाही.'
पुढे कतरिना म्हणाली, 'नंतर माझ्या लक्षात आले की रात्रीचे दोन वाजले होते. प्रश्न विचारण्याची ही योग्य वेळ नाही. नंतर मला खूप वाईट वाटलं.' कतरिनाचे बोलणे ऐकून आलिया आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना हसू अनावर झाले.
वाचा: 'तुम्ही मराठी माणसाच्या नावाने घरात राजकारण करु नका ना', छोटा पुढारी घन:श्यामची स्पष्ट भूमिका
कतरिना कैफ आणि रणबीर कपूर एकेकाळी एकमेकांना डेट करत होते, पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर त्याने आलियासोबत लग्न केले. एवढं सगळं असूनही आलिया आणि कतरिना यांच्यामधील मैत्रित कधीही फूट पडली नाही. त्या आजही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.