मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Freddy Review: प्रेम अन् बदल्याच्या कथेला ट्वीस्टचा तडका, कार्तिक आर्यनचा ‘फ्रेडी’ का बघाल? वाचा...

Freddy Review: प्रेम अन् बदल्याच्या कथेला ट्वीस्टचा तडका, कार्तिक आर्यनचा ‘फ्रेडी’ का बघाल? वाचा...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 03, 2022 09:55 AM IST

Freddy Review: कार्तिक आर्यनचा हा नवा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षक घरबसल्या या चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकणार आहेत.

Freddy Review
Freddy Review

Freddy Review: सध्या बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता म्हणून कार्तिक आर्यनचं नाव अग्रक्रमी आहे. ‘भूल भुलैय्या २’ला मिळालेल्या यशानंतर कार्तिककडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नुकताच त्याचा ‘फ्रेडी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कार्तिक आर्यनचा हा नवा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षक घरबसल्या या चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकणार आहेत. ‘फ्रेडी’ या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटाच्या लूकसाठी त्याने तब्बल १४ किलो वजन देखील वाढवलं होतं. चला तर जाणून घेऊया नेमका कसा आहे हा चित्रपट....

‘फ्रेडी’ या चित्रपटाच्या कथा ‘डॉ. फ्रेडी जिनवाला’ नावाच्या एका पात्राभोवती फिरते. डॉ. फ्रेडी जिनवाला ही भूमिका कार्तिक आर्यनने साकारली आहे. फ्रेडी हा एकाकी आयुष्य जगणारा एक व्यक्ती आहे. त्याच्या आयुष्यात एकच जवळचा मित्र आहे तो म्हणजे त्याचा कासव ‘हार्डी’. फ्रेडी पेशाने डॉक्टर असला तरी, तो बालपणापासून इतरांपेक्षा जरा वेगळा आहे. सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा फ्रेडी ४-५ वर्ष डेटिंग अॅपवर असून देखील सिंगलच आहे. अनेक वर्षांनंतर त्याच्या आयुष्यात एका तरुणीची एन्ट्री होते.

फ्रेडीच्या आयुष्यात आलेल्या या तरुणीचं नाव आहे कैनाज. या चित्रपटात कैनाजची भूमिका अभिनेत्री अलाया फर्निचरवाला हिने साकारली आहे. कैनाज ही पतीकडून सतत मारहाण सहन करत असते. दरम्यान तिची भेट डॉ. फ्रेडीशी होते. हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघांच्या मार्गात अडथळा असतो तो कैनाजचा पती.. हा अडथळा दूर करण्यासाठी फ्रेडी कैनाजच्या पतीची हत्या करतो. त्याला वाटतं की, आता आपण आणि कैनाज एकत्र येऊ शकतो. मात्र इथेच कथेत एक मोठा ट्वीस्ट येतो. कैनाज फ्रेडी नव्हे तर दुसऱ्याच एका व्यक्तीच्या प्रेमात आहे, हे त्याला कळते आणि या चित्रपटाची कथा एकदम बदलून जाते. पुढे या कथेत अनेक ट्वीस्ट पाहायला मिळतात. फ्रेडी आणि कैनाजच्या नात्याचं पुढे काय होतं? फ्रेडी कैनाजला माफ करतो की शिक्षा देतो? पोलीस फ्रेडीला पकडू शकतात का? या सगळ्याची उत्तर मिळवण्यासाठी हा चित्रपट एकदा पाहायला हवा.

कसा आहे कलाकारांचा अभिनय?

‘फ्रेडी’मध्ये पुन्हा एकदा कार्तिक आर्यनच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे. कार्तिक आर्यनने प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्ती केली आहे. केवळ अभिनयच नव्हे, तर कार्तिकने त्याच्या शरीरयष्टीवर देखील प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याच्या अभिनयाच्या जादूने चित्रपट पाहताना विशेष धमाल येते. चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये कार्तिकच्या अभिनयाची जादू पाहायला मिळत आहे. कार्तिकसोबत अलायाचा अभिनय देखील चांगला झाला आहे. निगेटिव्ह भूमिकेत देखील ती चपखल बसली आहे.

‘फ्रेडी’ चित्रपटाची कथा पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धात अधिक उत्कंठावर्धक वाटते. मध्यंतरानंतरची या चित्रपटाची कथा प्रेक्षकाला खुर्चीला खिळवून ठेवते. चित्रपटातील ट्वीस्ट प्रेक्षकांना हादरवून टाकतात. चित्रपटाचं कॅमेरावर्क आणि संकलन उत्तम झालं आहे. चित्रपटाचं संगीत आणि संवाद देखील प्रभावशाली आहे. यामुळे चित्रपटाची रंगत वाढली आहे. फ्रेडी हे पात्र उत्तरार्धात अधिक जबरदस्त वाटतं. सुरुवातीपासून हा चित्रपट प्रेक्षकाला गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाल आहे. कार्तिक आर्यनचा हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्याचा आनंद घेऊ शकता. यामध्ये कार्तिक आणि अलायाच्या अभिनयाने भरपूर मनोरंजन होते.

चित्रपट: फ्रेडी

दिग्दर्शक: शशांक घोष

प्रमुख कलाकार: कार्तिक आर्यन, अलाया एफ

स्टार:

IPL_Entry_Point

विभाग