सध्या चित्रपटसृष्टीमध्ये इंडस्ट्रीमध्ये बायोपिकची क्रेझ पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक असे बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'कर्मवीरायण' असे त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे नाव आहे.
लहान वयातच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव पडलेल्या भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून ग्रामीण भागात शिक्षण संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात समाजात वर्चस्ववाद बोकाळला होता. त्यामुळे गरीब आणि बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित राहत होती. त्या मुलांनाही शिकण्याचा समान हक्क आहे असा भाऊराव पाटील यांचा ठाम विचार होता. त्या काळी अनेक लोकांनी भाऊरावांना विरोध केला. मात्र विरोधाला ज जुमानता शिक्षणाच्या प्रसाराचं कार्य सुरूच राहिले आणि विविध शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थीही शिक्षणाकडे वळू लागले. त्यामुळेच ग्रामीण भागातील साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत झाली. महाराष्ट्राला शिक्षणाच्या मार्गावर नेणारे भाऊराव कर्मवीर झाले. शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट आता चित्रपटाद्वारे पाहता येणार आहे.
वाचा: 'आई-वडील वेगळे झाले तेव्हा मला आनंद झाला', क्षिती जोग पहिल्यांदाच पालकांच्या घटस्फोटावर बोलली
'कर्मवीरायण' या चित्रपटात अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली असून, अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट आता १७ मे पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. कर्मवीर अण्णांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग आणि घटना यांचा समावेश या चित्रपटात करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: अभिनेत्री जुई गडकरी हिला जेलमध्ये टाकण्याची धमकी, काय आहे नेमकी भानगड? जाणून घ्या
धनंजय भावलेकर यांनी 'कर्मवीरायण' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. किशोर कदम, सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार, उषा नाईक अशा दिग्गज कलाकारांचा सशक्त अभिनय पाहायला मिळणार आहे. योगेश कोळी यांनी छायाचित्रण,संतोष गोठोस्कर यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे.
वाचा: अभिनेते महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'ची कमाल, तीन दिवसात कमावले कोट्यवधी रुपये