बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान आणि सैफ अली खान हे नेहमीच आपल्या चाहत्यांना चांगले संदेश देत असतात. ही जोडी नेहमीच आपल्या चाहत्यांना प्रेरणा देत असते. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जोडी आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. करीना कपूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमीच आपल्या सोशल मीडियावरून आपल्या आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असते.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी नुकतेच स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करून महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. स्वच्छता अभियानाला दहा वर्षे पूर्ण होत आहे. याचेच निमित्त साधून बॉलिवूडच्या या जोडीने भविष्यातील आनंदी जीवनासाठी निरोगी वातावरणाची किती आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. करीनाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर सैफसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात दोघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत मिशन’वर भर दिला.
या व्हिडीओमध्ये सैफ आणि करीना म्हणताना दिसत आहेत, ‘नमस्कार मी सैफ अली खान आणि मी करीना कपूर खान.. आज मी तुमच्याशी एक अभिनेत्री म्हणून नाही, तर आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असणारी आई म्हणून बोलत आहे. प्रत्येक कुटुंबाने स्वच्छ भारत अभियानात सहभागी झाले पाहिजे.’
त्यानंतर सैफ म्हणाला की, 'हे केवळ आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नाही, तर हे आपल्या मुलांना समजवून देण्यासाठी आहे की, निरोगी वातावरण हा आनंदी जीवनाचा पाया आहे.' करीना पुढे म्हणाली की, ‘महात्मा गांधी म्हणाले होते की बदल केवळ आपल्या कृतीतूनच होऊ शकतात. आज २ ऑक्टोबरला आम्ही त्यांच्या स्वच्छ भारताच्या स्वप्नाची पूर्तता करण्याचा संकल्प घेऊ इच्छितो.’
सैफने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना म्हटले की, ‘आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छ भारत या मिशनचे देशव्यापी चळवळीत रूपांतर करण्यासाठी कटिबद्ध राहून मजबूत नेतृत्व दर्शवले आहे. आणि लहानसहान कचरा उचलणे असो किंवा प्लॅस्टिकचा वापर टाळणे असो, हे आपल्या भविष्यासाठी किती महत्त्वाचे आहे, हे मुलांना समजावे अशी आमची इच्छा आहे.’ स्वच्छ भारत अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करून दाम्पत्याने आपल्या व्हिडीओचा समारोप केला.