बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खानच्या मुंबईतील राहत्या घरी घरफोडीचा प्रयत्न झाला. दरम्यान, चोराने सैफवर चाकून हल्ला केला. त्यानंतर मुलगा इब्राहिमने सैफला तातडीने रूग्णालयात दाखल केले. घडलेला प्रकार समोर येताच अनेकांनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर आता करीनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. तिने या पोस्टमध्ये आमच्यासाठी हे आव्हानात्मक आहे. त्यामुळे पडताळणी केल्याशिवाय कोणतीही माहिती देऊ नका अशी देखील विनंती केली आहे.
करीनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे.'आमच्या कुटुंबासाठी हा एक अविश्वसनीय आव्हानात्मक दिवस होता आणि आम्ही अजूनही घडलेल्या घटनांवर प्रतिक्रीया देण्याचा आणि सावरण्याचा प्रयत्न करीत आहोत. या कठीण काळातून जात असताना, मी आदरपूर्वक आणि नम्रपणे विनंती करते की मीडिया आणि पापाराझींनी सतत्याने स्पेक्युलेशन आणि कव्हरेज टाळावे' अशी विनंती करीनाने केली आहे.
पुढे करीना म्हणाली, आम्ही तुमची काळजी आणि पाठिंब्याचे स्वागत करतो, परंतु सातत्याने पाठपुरावा करणे आणि दखल घेणे ही जबरदस्तीच नाही तर आमच्या सुरक्षिततेसाठी देखील एक मोठा धोका निर्माण करते. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आमच्या खाजगी जीवनाचा आदर करा आणि कुटुंब म्हणून आम्हाला सावरण्यासाठी आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली स्पेस द्या..या संकटकाळात तुमच्या समजूतदारपणा आणि सहकार्याबद्दल मी तुमचे आगाऊ आभार मानते.
वाचा: अमृता सिंगने एकदा सैफ अली खानला दिल्या होत्या झोपेच्या गोळ्या, काय होते कारण?
डॉ. नीरज उत्तमणी यांनी हिंदुस्थान टाईम्सला सांगितले की, सैफला सहा ठिकाणी जखमा झाल्या आहेत. या जखमांपैकी दोन किरकोळ, दोन खोल आणि दोन अत्यंत खोल आहेत. एक जखम पाठीवर, मणक्याजवळ झाली आहे. नीरज उत्तमणी म्हणाले, 'चाकूच्या दुखापतीमुळे सैफच्या पाठीच्या कण्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे. तेथे चाकूचा तुकडा अडकला होता. तो तुकडा काढण्यासाठी आणि पाठीचा कणा दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. याशिवाय त्याच्या डाव्या हातावर आणि मानेच्या उजव्या बाजूला दोन खोल जखमा होत्या, ज्या प्लास्टिक सर्जरीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत. अभिनेत्याची प्रकृती आता स्थिर असून तो धोक्याबाहेर आहे."
संबंधित बातम्या