तुम्हाला काही दिवसांमध्ये प्रदर्शित झालेला एखादा महिलांवर आधारित कॉमेडी आणि ग्लॅमरचा तडका असलेला चित्रपट आठवतोय का? नाही ना.. कारण यापूर्वी असा चित्रपट आलाच नव्हता. कारण महिलांवर आलेले प्रत्येक चित्रपट हे कोणत्या तरी गंभीर विषयाला हात घालताना दिसतात. पण या सगळ्याला अपवाद ठरला तो म्हणजे 'क्रू' हा चित्रपट. या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचा जॉनर, कथा आणि कास्ट सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. मग चित्रपटात नेमकं काय दाखवण्यात आले आहे? असा प्रश्न सर्वांना पडला असेल. चला जाणून घेऊया चित्रपटाच्या कथेविषयी...
'क्रू' चित्रपटाची कथा ही फ्लाइट सुपरवायजर गीता सेठी, सीनियर फ्लाइट अटेंडेंट जॅस्मिन राणा आणि ज्युनिअर फ्लाइट अटेंडेंट दिव्या बाजवा यांच्याभोवती फिरते. या तिघीही कोहिनूर एअरलाइन्समध्ये काम करतात. पण या तिघींचेही स्वप्न एअरहॉस्टेस्ट होण्याचे नसते. त्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे हे काम करत असतात. पण जवळपास चार-पाच महिने त्यांचा पगार झालेला नसतो. एक दिवस अचानक त्यांना कळते की त्यांच्या एअरलाइनचा मालक फरार झाला आहे. हे ऐकून तिघींनाही वाईट वाटते. पण तिघीही हार मानत नाहीत. तिघीही श्रीमंत बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून एक मोठे कांड करतात. आता त्यांनी नेमकं काय कांड केले आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
वाचा: परिणिती चोप्रा देणार चाहत्यांना गुडन्यूज? सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण
करीना कपूर खानने जॅस्मिन राणा या भूमिकेत प्रेक्षकांची मने जिंकली आहे. संपूर्ण चित्रपटातील तिचे हावभाव सर्वांचे लक्ष वेधतात. तब्बूला बऱ्याच काळानंतर इतक्या ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाल्याने चाहते खूश झाले आहेत. गेल्या काही चित्रपटांमध्ये तब्बू पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत होती. त्यामुळे या चित्रपटात तब्बूला ग्लॅमरस लूकमध्ये पाहाताना सर्वजण खूश झाले आहेत. क्रिती सेनॉनने या चित्रपटात मजेशीर भूमिका साकारली आहे. ती सतत काही ना काही मजेशीर गोष्टी करताना दिसत आहे. तिघींच्याही भूमिका तुम्हाला नक्की आवडतील.
वाचा: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सहभागी व्हायचे? मग ही बातमी नक्की वाचा
चित्रपटाचे कास्टिंग जरी चांगले असले तरी कथा ही तितकी चांगली नाही. चित्रपटात कॉमेडी आहे, ग्लॅमर आहे पण यासोबतच अनेक इलॉजिकल सीन्स देखील आहेत. त्यामुळे २ तास ३ मिनिटांचा हा चित्रपट मध्ये मध्ये कंटाळवाणा वाटू लागतो. तसेच चित्रपटातील गाणी खूपच रटाळ वाटतात. दिलजित दोसांझ आणि बादशाह मिळून देखील काही खास जादू करु शकले नाहीत.